
दिवाळीच्या दिवसांमधला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन! धन, समृद्धी आणि मंगलप्राप्तीसाठी प्रत्येकजण या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना करतो. यंदा लक्ष्मीपूजनासाठी फक्त अडीच तासांचा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे पूजाविधी वेळेत आणि शास्त्रानुसार पार पाडण्यासाठी तयारी अगोदरच करणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधीची सर्व माहिती...
लक्ष्मीपूजन तारीख आणि मुहूर्त
२० ऑक्टोबर २०२५ (सोमवार) रोजी प्रदोषकाळात अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे ती तिथी प्रदोषव्याप्त मानली जाते. मात्र दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) रोजी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे. म्हणूनच लक्ष्मीपूजन करण्यासाठी मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ हा दिवस शास्त्रसंमत आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे.
या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने, सायंकाळी प्रदोषकाळात, म्हणजेच सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करणे सर्वात मंगलकारी ठरेल.
लक्ष्मीपूजनाची तयारी आणि मांडणी
पूजेपूर्वी घर आणि पूजेची जागा स्वच्छ ठेवावी. दारावर तोरण लावून आणि घरात रांगोळी काढून शुभ वातावरण तयार करावे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर तांदळाचे आसन तयार करावे आणि त्यावर कलश स्थापित करावा. हा कलश पाण्याने भरलेला असावा, त्यावर नारळ ठेवून आंब्याच्या डहाळ्यांनी सजवावा. कलशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. देवीसमोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवून पूजनाची सुरुवात करावी. त्याच आसनावर दागिने, नाणी, पैसे, खातेवही किंवा व्यवसायाची कागदपत्रे ठेवून त्यांचीही पूजा केली जाते. पूजेसाठी हळद, कुंकू, चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे, विड्याची पाने, सुपारी आणि पंचामृत अशी सर्व सामग्री तयार ठेवावी. दिवा प्रज्वलित करणे ही पूजेची अत्यावश्यक प्रक्रिया आहे.
लक्ष्मीपूजन विधी
पूजेच्या प्रारंभी आचमन करून लक्ष्मीपूजेचा संकल्प करावा. सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून ‘ॐ गं गणपतये नमः’ मंत्र जपावा. त्यानंतर कलश आणि कुबेरादी देवतांचे पूजन करावे. मग महालक्ष्मीचे षोडशोपचार पूजन करावे. देवीला हळद, कुंकू, चंदन लावावे, कमळाचे किंवा शुभ्र फुले अर्पण करावीत आणि पंचामृताने तसेच शुद्ध पाण्याने स्नान घालावे. वस्त्र, आभूषण आणि गंध अर्पण करून धूप आणि दीप प्रज्वलित करावा. ‘ॐ महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा जप करणे अत्यंत मंगलकारी मानले जाते.
यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा. लाह्या, बत्तासे, गोड पदार्थ, खिर किंवा मिठाई, फळे तसेच विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करावीत. त्यानंतर गणपती आणि महालक्ष्मीची आरती करून घरातील सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा. पूजेत काही त्रुटी राहिली असल्यास देवीकडे क्षमा मागावी आणि घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदावे अशी प्रार्थना करावी.
पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटावा आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून रात्रभर दिवा तेवत ठेवावा. लक्ष्मीपूजनाच्या रात्री अनेक ठिकाणी ‘अलक्ष्मी निस्सारण’ करण्याची परंपरा देखील पाळली जाते. यानुसार झाडूचे पूजन करून मध्यरात्री घराची साफसफाई केली जाते आणि कचरा घराबाहेर टाकला जातो. यामुळे दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर होऊन घरात सुख-शांती आणि समृद्धी टिकून राहते, असा समज आहे