माघी गणेश जयंतीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी तिळ-गुळाला विशेष महत्त्व आहे. तिळ हे पवित्रता आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते, तर गूळ शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा देतो. माघ महिन्यातील थंडीत तिळ-गुळाचे मिश्रण आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. त्यामुळे आज माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यात तिळगुळाचे मोदक अर्पण करून हा सण अधिक खास बनवू शकता. चला तर जाणून घेऊया तिळगुळाचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी...
साहित्य :
गूळ - १ वाटी
तीळ - १ वाटी
कणीक - २ वाट्या
तूप - आवश्यकतेनुसार
कृती :
सर्वात आधी कणीक नीट मळून झाकून बाजूला ठेवा. त्यानंतर एका कढईत तीळ मंद आचेवर सावकाश भाजून घ्या; तीळ जळणार नाहीत याची काळजी घ्या आणि त्यांचा रंग बदलू देऊ नका. वेगळ्या भांड्यात गुळाचा पाक तयार करा. पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले तीळ घालून मिश्रण नीट एकजीव करून घ्या. आता मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करून त्याची पातळ पोळी लाटा. या पोळीत तिळ-गुळाचे सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या. कढईत तूप गरम करून हे मोदक मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तिळ-गुळाचे सारण थोडे गरम असतानाच साच्यात भरून मोदकाचा शेप दिल्यास मोदक अधिक सुंदर आणि आकर्षक तयार होतात.
लक्षात ठेवा -
तिळ जास्त भाजले गेले तर कडू लागतात, त्यामुळे मंद आचेवरच भाजा.
सारण फार घट्ट किंवा फार पातळ करू नका, नाहीतर मोदक भरताना अडचण येते.
मोदक अधिक चवदार हवेत तर सारणात थोडे तूप मिसळू शकता.
तळताना तेल किंवा तूप जास्त गरम नसावे, नाहीतर मोदक पटकन काळे पडतात.
नैवेद्यासाठी मोदक तयार झाल्यावर थोडेसे तूप वरून लावल्यास त्यांना छान चकाकी येते.