

माघी गणेशोत्सवात बाप्पाचे आगमन होताच उकडीचे मोदक अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. नारळ-गूळ यांचे गोड सारण आणि तांदळाच्या पिठाची उकड असलेले मोदक हे बाप्पाचे आवडते नैवेद्य मानले जाते. यंदा माघी गणपतीनिमित्त घरीच सोप्या पद्धतीने पारंपरिक उकडीचे मोदक बनवण्यासाठी वाचा सोपी रेसिपी.
साहित्य -
सारणासाठी :
किसलेला ओला नारळ - १ वाटी
गूळ - पाऊण वाटी
वेलदोडा पूड - अर्धा टीस्पून
जायफळ पूड - चिमूटभर
उकडीसाठी :
तांदळाचे पीठ - १ वाटी
पाणी - दीड वाटी
मीठ - चिमूटभर
तूप किंवा तेल - १ टीस्पून
कृती :
सर्वप्रथम कढईत किसलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मध्यम आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट झाले की वेलदोडा व जायफळ पूड घालून गॅस बंद करा. सारण थंड होऊ द्या.
आता उकडीसाठी भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि तूप घाला. पाणी उकळल्यावर तांदळाचे पीठ घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर वाफ येऊ द्या. नंतर पीठ चांगले मळून घ्या.
पीठाचा गोळा घेऊन छोटी पातळ पारी करा, त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. तयार मोदक वाफवण्याच्या भांड्यात १० ते १२ मिनिटे वाफवा.
गरमागरम उकडीचे मोदक तयार झाले की ते गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण करा.