

२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाभिमान, तिरंगा आणि खास क्षणांचा उत्सव. या दिवशी केवळ ध्वजारोहणच नाही, तर जेवणाच्या ताटातही देशभक्तीचा रंग असावा, अशी अनेकांची इच्छा असते. याच पार्श्वभूमीवर, यंदा घरच्या-घरी बनवा तिरंगा बिर्याणी / पुलाव. केशरी, पांढरा आणि हिरवा अशा तिरंग्याच्या रंगांनी सजलेला हा पदार्थ दिसायला जितका आकर्षक आहे, तितकाच चवीला देखील स्वादिष्ट आहे. सोपी कृती आणि सहज मिळणारे साहित्य यामुळे ही रेसिपी कोणालाही बनवता येईल. चला तर मग जाणून घेऊया ही खास रिपब्लिक डे स्पेशल रेसिपी.
तिरंगा बिर्याणी / पुलावसाठी लागणारे साहित्य :
भातासाठी :
बासमती तांदूळ - २ कप
तूप / तेल - २ टेबलस्पून
जिरे - १ टीस्पून
मीठ - चवीनुसार
केशरी (ऑरेंज) भागासाठी :
गाजर किसलेले - १ कप
लाल मिरची पावडर - अर्धा टीस्पून
गरम मसाला - अर्धा टीस्पून
पांढऱ्या भागासाठी :
उकडलेला भात- १ भाग
हिरव्या भागासाठी :
पालक किंवा कोथिंबीर पेस्ट - ½ कप
हिरवी मिरची पेस्ट - १ टीस्पून
लिंबाचा रस - १ टीस्पून
सजावटीसाठी :
काजू, मनुका
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या आणि मीठ घालून शिजवून ठेवा. भात थंड झाल्यावर त्याचे तीन समान भाग करा.
एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करून जिरे घाला. त्यात गाजर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून परतून घ्या. यात भाताचा एक भाग मिसळा. यामुळे केशरी रंगाचा भात तयार होईल.
पांढऱ्या भागासाठी शिजवलेला भात तसाच वापरा.
तिसऱ्या भागात पालक किंवा कोथिंबीर पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट आणि लिंबाचा रस घालून भात नीट मिसळा. यामुळे हिरव्या रंगाचा भात तयार होईल.
आता सर्व्हिंग प्लेटमध्ये किंवा मोठ्या भांड्यात आधी हिरवा, मग पांढरा आणि शेवटी केशरी भात असे थर लावा. वरून काजू, मनुका आणि कोथिंबीरीने सजावट करा.
रिपब्लिक डे (Republic Day) साठी परफेक्ट डिश
तिरंगा बिर्याणी / पुलाव हा पदार्थ रिपब्लिक डे, शाळेचे कार्यक्रम किंवा खास पाहुण्यांसाठी उत्तम पर्याय आहे. कमी साहित्यांत तयार होणारी ही रेसिपी आरोग्यदायी आणि आकर्षक असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.
टीप : बिर्याणीमधील पांढरा भाग अधिक रुचकर करण्यासाठी दही किंवा क्रीमचा वापरही करू शकता.