मकरसंक्रांत अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे आणि सगळीकडे सणाची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी पतंगांनी, मांज्याच्या रिळांनी गजबजल्या आहेत; काळ्या रंगाच्या ड्रेसेस, साड्या, दागिन्यांची खरेदीही जोरात सुरू आहे. घराघरांत गोडधोडाची तयारी चालू असतानाच या सणाची खरी ओळख ठरणारा तिळगूळही तितकाच महत्त्वाचा ठरतो. "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" या परंपरेला जपत दरवर्षी लाडू बनवले जातातच; पण यंदा या गोड परंपरेला द्यायचा आहे जरा हटके ट्विस्ट. नेहमीचे तिळगुळाचे लाडू बाजूला ठेवून यावेळी मऊ, चवदार तिळाच्या वड्या तयार करा आणि मकरसंक्रांतीचा गोडवा थोड्या वेगळ्या अंदाजात साजरा करा.
साहित्य :
तिळ - १ कप
गूळ - ¾ कप (किसलेला किंवा बारीक केलेला)
पाणी - २ ते ३ टेबलस्पून
वेलची पूड - ½ टीस्पून
तूप - १ टीस्पून
सुकं खोबरं - २ टेबलस्पून (ऐच्छिक)
बदाम / काजू - १ टेबलस्पून (बारीक चिरलेले – ऐच्छिक)
कृती :
१) कढईत तिळ हलकेच मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. तिळ तडतडायला लागले की गॅस बंद करून ते थंड होऊ द्या.
२) दुसऱ्या कढईत किसलेला गूळ आणि पाणी घालून मंद आचेवर वितळवा. गूळ पूर्ण विरघळल्यानंतर एक उकळी येऊ द्या.
३) गूळ नीट विरघळल्यावर त्यात तूप घालून मिक्स करा.
४) आता यात भाजलेले तिळ, वेलची पूड, सुकं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स घालून सगळं व्यवस्थित एकत्र करा.
५) मिश्रण कढईच्या कडांपासून सुटू लागलं की गॅस बंद करा.
६) लगेच हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये पातळसर थापा.
७) वरून सुरीने वड्यांचे आकार कापून घ्या. थंड झाल्यावर वड्या वेगळ्या करा.
तिळाच्या वड्या मऊ होऊ नयेत यासाठी टिप्स
गूळ जास्त पातळ करू नका; जास्त पाणी घातल्यास वड्या मऊ पडतात.
तिळ नीट खमंग भाजलेले असावेत; ओलसर तिळ वड्या चिकट करतात.
गूळ वितळवताना फार उकळी येऊ देऊ नका, एक उकळी पुरेशी आहे.
मिश्रण गरम असतानाच वड्या कापा; थंड झाल्यावर कापल्यास त्या तुटू शकतात.
वड्या पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा आणि हवाबंद डब्यात साठवा.
यंदा मकरसंक्रांतीला तिळगुळाच्या लाडूंना थोडी विश्रांती देऊन या मऊ पण खमंग तिळाच्या वड्या नक्की ट्राय करा.