फक्त वय झाल्यावरच केस पांढरे होतात असं नाही, तर आजकाल चुकीची जीवनशैली, ताणतणाव, अपुरी झोप आणि वातावरणीय बदल यामुळे तरुण वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. यामुळे लोक डाय, कलर किंवा मेहंदी यांचा आधार घेतात. मात्र डाय आणि कलरमुळे केसांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यापेक्षा नैसर्गिक व सुरक्षित पर्याय म्हणजे मेहंदी. मेहंदी केसांना रंग तर देतेच पण त्याच वेळी नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करते. मात्र चुकीच्या पद्धतीनं लावल्यास ती उलट केसांना कोरडे आणि निस्तेज करू शकते.
मेहंदी लावताना पाळायच्या ६ खास टिप्स
मेहंदी खूप वेळ केसांवर ठेवू नका. रंगासाठी लावली असल्यास फक्त दीड तास, आणि कंडिशनिंगसाठी लावताना पाऊण तास पुरेसा असतो.
केस कोरडे होऊ नयेत म्हणून मेहंदी भिजवताना त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल किंवा दही मिसळा. मेहंदी धुतल्यानंतर थोड्या ओलसर केसांना लगेच तेल लावा.
मेहंदीमुळे आलेल्या कोरडेपणावर उपाय म्हणून ऑलिव्ह ऑइल, दही आणि लिंबाचा रस मिसळून पॅक लावा. केस मऊ आणि चमकदार होतील.
अंड्याचा पांढरा भाग, ऑलिव्ह ऑइल, मध, लिंबाचा रस आणि व्हिनेगर यांचा पॅक केसांना लावल्यास केस नरम व मऊसूत होतात.
केळ, कोरफडीचा गर आणि कोणतेही तेल यांचे मिश्रण करून लावल्यास कोरडे केस पुन्हा तजेलदार होतात.
मेहंदी भिजवताना त्यात आवळा पावडर, दही आणि अंड घातल्यास कोरडेपणा कमी होतो. आवळा पावडरऐवजी आवळ्याचं तेल किंवा बदाम तेलही वापरता येतं.
त्यामुळे, मेहंदी केसांसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय असला तरी तिचा योग्य वापर करणं अत्यावश्यक आहे. योग्य पद्धतीनं मेहंदी लावल्यास पांढरे केस झाकले जातात, केसांची चमक वाढते आणि ते होतात सुंदर व निरोगी.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)