
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ कमी मिळतो. चुकीच्या खाण्याच्या सवयी, झोपेचा अभाव आणि सततचा ताणतणाव यामुळे अनेक आजार वाढतात. त्यात मायग्रेन ही एक मोठी त्रासदायक समस्या मानली जाते. यामध्ये तीव्र डोकेदुखी, उलट्या, मळमळ, तसेच प्रकाश आणि मोठा आवाज सहन न होणे ही लक्षणं दिसून येतात. काही वेळा डोक्याच्या फक्त एका बाजूला जाणवणारी ही वेदना इतकी तीव्र असते की संबंधित व्यक्तीला कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
झोपेचा अभाव, हार्मोनल बदल, चुकीच्या आहारपद्धती आणि मानसिक तणाव ही त्यामागची प्रमुख कारणं ठरतात.
मायग्रेनने त्रस्त असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, संपूर्ण धान्य, कडधान्यं आणि काजू यांचं सेवन केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रथिनं मिळतात. पुरेसं पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं, ज्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. विशेषतः हिरव्या भाज्या पचनक्रिया सुधारतात आणि मेंदूला पोषण देतात.
मायग्रेनमध्ये चॉकलेट, कॅफिन, जास्त गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. हे पदार्थ डोकेदुखीची तीव्रता वाढवू शकतात.
जीवनशैलीत काही सवयी अंगीकारल्यास मायग्रेनवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं-
दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
योगा आणि ध्यान केल्याने ताण कमी होतो व मानसिक आरोग्य सुधारतं.
दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचं संतुलन राखलं जातं.
नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारतं व ताणतणाव दूर होतो.
योग्य आहार आणि नियमित दिनचर्या यांचा अवलंब केल्यास मायग्रेनची समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)