जेवणाच्या ताटात लोणचं असेल, तर चार घास नकळत जास्तच जातात. बाजारात मिळणाऱ्या ताज्या भाज्यांचा वापर करून तुम्ही अगदी कमी वेळात घरच्याघरी चवदार मिक्स भाज्यांचं लोणचं तयार करू शकता. आंबटगोड, किंचित तिखट आणि मसाल्याचा दरवळ असलेलं हे लोणचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. हिवाळ्यात गाजर, मुळा, फुलकोबी, मटार, हिरवी मिरची अशा भाज्या सहज मिळतात. नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळ्या स्वरूपात या भाज्या खाल्ल्या, तर मुलंही त्या आवडीने खातात. झटपट बनणारं आणि चवीला भन्नाट असलेलं हे लोणचं काही दिवस टिकतं आणि जेवणाची मजा अधिक वाढवतं.
साहित्य :
गाजर
फुलकोबी
मटार
हिरवी मिरची (हवी असल्यास)
मीठ
गूळ (किसलेला)
लाल तिखट
लोणच्याचा मसाला
मोहरी
मेथी दाणे
हळद
हिंग
तेल
कृती
मिक्स भाज्यांचं लोणचं तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या नीट स्वच्छ धुवा आणि मध्यम आकारात कापा. फार बारीक कापू नका, म्हणजे लोणच्याला चांगली घट्टपणा राहतो. धुतलेल्या भाज्या स्वच्छ कापडावर पसरून त्यातील अतिरिक्त पाणी पूर्ण निघू द्या. कोरड्या झालेल्या भाज्या एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यात मीठ, किसलेला गूळ, लाल तिखट, हळद, हिंग आणि लोणच्याचा मसाला घालून हलक्या हाताने मिक्स करा.
आता कढईत तेल गरम करा. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की मेथी दाणे आणि थोडीशी हळद घालून फोडणी तयार करा. ही गरम फोडणी भाज्यांच्या मिश्रणावर ओता आणि सगळं नीट एकजीव करा. तयार लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरा. दोन-तीन दिवस लोणचं मुरू द्या. मसाले भाज्यांमध्ये छान मुरल्यानंतर हे लोणचं खाण्यास तयार होतं.
लक्षात ठेवा :
मिक्स भाज्यांचं लोणचं बनवताना भाज्यांमधलं अतिरिक्त पाणी काढणं आवश्यक आहे; त्यामुळे लोणचं लवकर खराब होत नाही.
मोहरी आणि मेथी दाण्याची फोडणी सर्वात शेवटी ओतल्यास मसाल्याची चव अधिक उठून येते.
नेहमी लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत साठवा, त्यामुळे ते जास्त काळ ताजं राहील.