पावसाळ्यात बाहेर पडताना छत्री, रेनकोट आणि बॅगची काळजी घेतली तरी अचानक आलेल्या पावसामुळे खिशातील पैसे किंवा बॅगेतील महत्त्वाची कागदपत्रं भिजण्याची शक्यता असते. त्यात नोटा पूर्णपणे ओल्या झाल्या की त्या फाटतील किंवा खराब होतील, अशी भीती वाटते. मात्र अशावेळी घाईघाईने वाळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा योग्य पद्धत वापरणं महत्त्वाचं आहे.
ओल्या नोटा लगेच जोरात चोळणे, एकमेकांपासून खेचून वेगळ्या करणे किंवा थेट जास्त उष्णता देणे टाळा. त्याऐवजी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही सोप्या गोष्टींच्या मदतीने नोटा हळूहळू सुकवता येतात. जाणून घ्या, पावसात भिजलेल्या नोटांसोबत नेमकं काय करायचं.
सर्वप्रथम नोटा हवेशीर ठिकाणी ठेवा
नोटा भिजल्या असतील तर त्या शक्य तितक्या काळजीपूर्वक मोकळ्या हवेत पसरवून ठेवा. पंख्याखाली ठेवल्यास त्यांना हवा मिळेल आणि त्या हळूहळू सुकण्यास मदत होईल. मात्र नोटा एकमेकींना चिकटलेल्या असतील तर त्या जबरदस्तीने वेगळ्या करू नका.
चिकटलेल्या नोटा ओढून वेगळ्या करू नका
ओल्या नोटा एकमेकांना चिकटल्या असतील तर त्या लगेच खेचून वेगळ्या करण्याचा प्रयत्न केल्यास कागद फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या थोड्या सुकू द्या. ओलावा कमी झाल्यानंतर त्या अलगद वेगळ्या करता येतील.
इस्त्री वापरताना विशेष काळजी घ्या
नोटा सुकवण्यासाठी इस्त्रीचा वापर करायचा असल्यास थेट नोटेवर इस्त्री फिरवण्याऐवजी त्यावर पातळ सुती कापड ठेवा. त्यानंतर कमी उष्णतेवर इस्त्री हलक्या हाताने दाबून घ्या आणि लगेच उचलून घ्या. सतत इस्त्री फिरवल्यास नोट खराब किंवा फाटू शकते.
थेट गॅसच्या उष्णतेपासून दूर ठेवा
नोट पटकन सुकवण्यासाठी तवा किंवा गॅसची थेट उष्णता वापरण्याचा मोह होऊ शकतो. मात्र जास्त तापमानामुळे नोट जळण्याचा, आकसण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे नैसर्गिक हवा किंवा पंख्याची हवा हा अधिक सुरक्षित पर्याय आहे.
नोटा सुकल्यानंतर काय कराल?
नोटा पूर्णपणे कोरड्या झाल्यानंतर त्या सरळ करून काही काळ पुस्तक किंवा जड वस्तूखाली ठेवू शकता. त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. मात्र नोटेला पुन्हा पूर्वीसारखा अगदी नवा पोत मिळेलच असं नाही.
महत्त्वाची कागदपत्रं भिजली असतील तर त्यांनाही शक्य तितक्या लवकर हवेशीर ठिकाणी सपाट पसरवून वाळवा. कागद ओला असताना त्याला जास्त हाताळणे किंवा जोरात घासणे टाळा.