

Morning Habits For Kidney Health : सकाळची सुरुवात कशी होते, यावर अनेकदा संपूर्ण दिवसाचा मूड आणि ऊर्जा अवलंबून असते. मात्र, सकाळच्या काही सवयी आरोग्यासाठी फायदेशीर असण्याऐवजी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर ताण आणू शकतात. विशेषतः किडनीच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या काही सवयी आपण नकळत रोजच्या दिनचर्येत करत असतो. सकाळी उठल्यानंतर पाणी न पिणे, लघवी रोखून धरणे, रिकाम्या पोटी वेदनाशामक औषधे घेणे, व्यायामानंतर शरीराला पुरेसे पाणी न देणे आणि नाश्ता टाळणे अशा पाच सवयी किडनीसाठी त्रासदायक ठरू शकतात.
यासंदर्भात युरोलॉजिस्ट डॉ. वेंकटसुब्रमण्यम यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, रात्रीच्या झोपेदरम्यान शरीरात सौम्य प्रमाणात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.
सकाळी उठल्यावर पाणी न पिता थेट चहा-कॉफी घेता?
अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीशिवाय सुरू होत नाही. मात्र, उठल्यानंतर सर्वप्रथम एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावणे फायदेशीर ठरू शकते. रात्री अनेक तास पाणी न घेतल्यामुळे शरीराला आणि किडनीला द्रवपदार्थांची गरज असते. त्यामुळे सकाळी चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळी लघवी रोखून धरता?
रात्री झोपताना अनेक तास लघवी रोखली जाते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लघवीची इच्छा झाल्यास ती जास्त वेळ रोखून न ठेवता मूत्राशय रिकामा करणे महत्त्वाचे आहे. दिवसभरही वारंवार लघवी रोखून ठेवण्याची सवय टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
रिकाम्या पोटी वेदनाशामक औषधे घेता?
डोकेदुखी किंवा शरीरदुखी जाणवल्यास काही जण सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटीच वेदनाशामक औषधे घेतात. मात्र, वेदनाशामक औषधांचा अनावश्यक किंवा चुकीचा वापर किडनीसाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा औषधांचे सेवन करण्याचे टाळावे.
व्यायामानंतर पाणी पिणे विसरता?
सकाळी व्यायाम किंवा वर्कआउट केल्यानंतर शरीरातून घामाच्या माध्यमातून द्रवपदार्थ कमी होतात. अशावेळी पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीर डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे व्यायामानंतर शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
नाश्ता टाळण्याची सवय आहे?
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण सकाळचा नाश्ता टाळतात. मात्र, दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करणे महत्त्वाचे आहे. नाश्ता टाळल्यास नंतर भूक लागल्यावर अनेकदा जास्त मीठ असलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याची शक्यता वाढू शकते. आहारातील अतिरिक्त सोडियमचे सेवन किडनीच्या आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही.
किडनीच्या आरोग्यासाठी सकाळच्या सवयी सुधारा
किडनी शरीरातील महत्त्वाचे काम पार पाडते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे, लघवी जास्त वेळ रोखून न ठेवणे, औषधांचा योग्य वापर करणे, व्यायामानंतर हायड्रेट राहणे आणि पौष्टिक नाश्ता करणे या सवयी आरोग्यदायी दिनचर्येचा भाग बनवता येतील.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)