

दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करताना स्नॅक्सशिवाय दिवस पूर्णच होत नाही. बिस्किटं, वेफर्स, समोसे किंवा वडापाव असं काहीतरी खाल्ल्याशिवाय मेंदू कामालाच लागत नाही असं आपल्याला वाटतं. पण हेच सगळं आरोग्याचं नुकसान करतंय, हे लक्षातच येत नाही.
स्नॅक्स निवडताना स्मार्ट व्हा
ऑफिसमध्ये काम करताना आपल्याला पटकन काहीतरी खायचं असतं, पण ते चटपटीत असण्याची गरज नाही. चणे, भाजलेले दाणे, सुका मेवा, चुरमुरे किंवा एखादं फळ हे उत्तम पर्याय आहेत. जास्त मीठ असलेले पदार्थ, वेफर्स, पॉपकॉर्न, बिस्किटं यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे त्यांना ‘नाही’ म्हणायला शिका.
सतत बसून राहणं टाळा
ऑफिसचं काम म्हणजे सतत कम्प्युटर समोर बसणं. पण सलग सात-आठ तास खुर्चीत बसणं शरीरासाठी धोकादायक आहे. प्रत्येक तासाभरानं थोडं उठून चालणं, स्ट्रेचिंग करणं यामुळे शरीरात रक्तप्रवाह सुधारतो आणि थकवा कमी होतो.
ताणावर नियंत्रण ठेवा
वर्क प्रेशर असणं स्वाभाविक आहे, पण प्रत्येकवेळी त्याचा ताण घेणं बरोबर नाही. कामाचं योग्य नियोजन करा. वेळेत काम पूर्ण करा आणि ऑफिस संपल्यावर घरच्या वेळेत ऑफिसचे विचार मागे ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवणं ही खरी ‘स्ट्रेस रिलीफ थेरपी’ आहे.
दीर्घ श्वसन आणि पाण्याचं महत्त्व
आपण बऱ्याचवेळा कामात एवढं गुंतून जातो की पाणी प्यायचं विसरतो. टेबलवर नेहमी पाण्याची बाटली ठेवा. आणि थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा. तसेच दररोज काही मिनिटं दीर्घ श्वसन करा. दीर्घ श्वास घेणं हे मेंदूला ऑक्सिजन पुरवतं आणि मन शांत ठेवतं.
थोडक्यात, ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसून काम करावं लागतं हे खरं, पण त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ देऊ नका. खाण्यापिण्याच्या, हालचालीच्या आणि विचारांच्या छोट्या सवयी बदलल्या, की ऑफिसलाइफही फिट, फ्रेश आणि हेल्दी बनतं!