OTP, पासवर्ड अन् QR कोड; मुलांना ऑनलाइन स्कॅमपासून वाचवण्यासाठी पालकांनी शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Online Safety Tips : मोफत भेटवस्तू, बक्षिसे किंवा आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली फसव्या लिंक पाठवल्या जातात. अशा लिंकवर क्लिक केल्यास वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. त्यामुळे...
OTP, पासवर्ड अन् QR कोड; मुलांना ऑनलाइन स्कॅमपासून वाचवण्यासाठी पालकांनी शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
OTP, पासवर्ड अन् QR कोड; मुलांना ऑनलाइन स्कॅमपासून वाचवण्यासाठी पालकांनी शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

आजकाल लहान मुलांच्याही हातात स्मार्टफोन असतो. ऑनलाइन गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे आणि विविध ॲप्स वापरणे हा त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. मात्र, इंटरनेटचा वापर वाढत असताना ऑनलाइन फसवणुकीचा धोकाही वाढत आहे. मोफत गेमिंग रिवॉर्ड्स, आकर्षक ऑफर्स, संशयास्पद लिंक आणि बनावट मेसेजच्या माध्यमातून मुलांची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे मुलांना इंटरनेट वापरण्याचे स्वातंत्र्य देतानाच ऑनलाइन धोके ओळखण्याचे शिक्षण देणेही महत्त्वाचे आहे. यासाठी 'अ पॅरेंट्स गाइड टू डिजिटल वेलबीइंग इन इंडिया' या तज्ज्ञांच्या मार्गदर्शिकेत पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुलांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या ६ गोष्टी शिकवणे आवश्यक आहे.

OTP, पासवर्ड अन् QR कोड; मुलांना ऑनलाइन स्कॅमपासून वाचवण्यासाठी पालकांनी शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
भारतात अश्लील अन् हिंसक कंटेंटला लगाम; मेटाकडून Instagram च्या रिकमेंडेशन सिस्टीममध्ये बदल

१. मोफत गेमिंग रिवॉर्ड्सच्या आमिषाला बळी पडू देऊ नका

ऑनलाइन गेम खेळताना मुलांना मोफत गेमिंग कॉइन्स, विशेष रिवॉर्ड्स किंवा स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन मिळवून देण्याचे मेसेज दिसू शकतात. काही वेळा मोठ्या सवलतींचीही आमिषे दाखवली जातात. मात्र, अशा आकर्षक ऑफर्सच्या माध्यमातून मुलांची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही अनपेक्षित ऑफर मिळाल्यास त्यावर लगेच विश्वास न ठेवता तिची सत्यता तपासण्याची सवय मुलांना लावा.

२. कोणतीही अनोळखी लिंक उघडण्यापूर्वी तपासायला सांगा

मोफत भेटवस्तू, बक्षिसे किंवा आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली फसव्या लिंक पाठवल्या जातात. अशा लिंकवर क्लिक केल्यास वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून आलेली लिंक किंवा संशयास्पद मेसेज दिसल्यास त्यावर क्लिक करण्याआधी पालकांना विचारण्यास मुलांना सांगा. कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी ती विश्वासार्ह आहे का, हे तपासण्याची सवय लावा.

३. ओटीपी, पिन आणि पासवर्ड कोणालाही सांगू नका

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी, एटीएम किंवा यूपीआय पिन आणि पासवर्ड सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फोन कॉल किंवा मेसेजद्वारे अनोळखी व्यक्तीने ही माहिती मागितली, तरी ती देऊ नये, हे मुलांना समजावून सांगा. या गोष्टी वैयक्तिक असून त्या कोणासोबतही शेअर करायच्या नसतात, याची जाणीव करून द्या.

OTP, पासवर्ड अन् QR कोड; मुलांना ऑनलाइन स्कॅमपासून वाचवण्यासाठी पालकांनी शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
भारतातील युजर्ससाठी Apple Maps चे नवे फीचर्स; आता 3D लँडमार्कसह मराठीतही मिळणार रस्त्यांची माहिती, वाचा सविस्तर

४. क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी त्याचा वापर समजावून सांगा

आजकाल डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोडचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे मुलांना क्यूआर कोड आणि पिनचा योग्य वापर समजणे गरजेचे आहे. मार्गदर्शिकेनुसार, क्यूआर कोड स्कॅन करणे किंवा पिन टाकणे हे पैसे पाठवण्यासाठी असते, पैसे मिळवण्यासाठी नाही. हा फरक मुलांना स्पष्टपणे समजावून सांगा. त्यामुळे पैसे मिळवण्याच्या नावाखाली पाठवण्यात आलेल्या संशयास्पद पेमेंट विनंत्यांपासून त्यांना सावध राहता येईल.

५. घरातील शेअर केलेल्या मोबाईलसाठी पासवर्डचे नियम ठरवा

अनेक घरांमध्ये एकाच मोबाईल किंवा टॅबलेटचा वापर कुटुंबातील अनेक सदस्य करतात. अशा वेळी मुलांनी स्वतःचे पासवर्ड इतरांना सांगू नयेत. तसेच शेअर केलेल्या ब्राउझरमध्ये पेमेंटची माहिती सेव्ह करू नये. प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र प्रोफाइल तयार करणे आणि डिव्हाइससाठी पासकोडचे स्पष्ट नियम ठरवणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे खात्याची गोपनीयता राखण्यास आणि चुकून होणारे ऑनलाइन व्यवहार किंवा डाउनलोड टाळण्यास मदत होते.

OTP, पासवर्ड अन् QR कोड; मुलांना ऑनलाइन स्कॅमपासून वाचवण्यासाठी पालकांनी शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी
AI Photo Safety : मुलांचे फोटो AI ॲप्सवर अपलोड करताय? पालकांनो, आधी 'या' गोष्टी नक्की तपासा

६. ऑनलाइन काही संशयास्पद आढळल्यास पालकांना सांगा

मुलांना अनोळखी मेसेज, संशयास्पद लिंक किंवा आकर्षक ऑफर दिसल्यास त्यांनी त्याबाबत पालकांना सांगावे. यासाठी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. केवळ मोबाईल वापरण्यावर निर्बंध घालण्याऐवजी मुलांना कोणते ॲप्स आवडतात, ते इंटरनेटवर काय पाहतात आणि कोणते गेम खेळतात, हे जाणून घ्या. ऑनलाइन काही अडचण आल्यास न घाबरता पालकांशी बोलता येईल, असा विश्वास मुलांमध्ये निर्माण करा. त्यामुळे संभाव्य फसवणूक वेळीच ओळखण्यास मदत होईल.

मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यापेक्षा जागरूक करणे महत्त्वाचे

मुलांची ऑनलाइन सुरक्षितता म्हणजे केवळ इंटरनेट वापरण्यावर मर्यादा घालणे नव्हे. तर त्यांना डिजिटल जगात योग्य-अयोग्य गोष्टी ओळखण्याची समज देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, पेमेंटमधील सुरक्षितता, पासवर्डचे महत्त्व आणि संशयास्पद लिंक याबाबत मुलांशी नियमित चर्चा करा. यामुळे इंटरनेटचा वापर करताना ते अधिक सावध आणि जबाबदार बनतील.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)