
श्रावण महिना म्हणजे भक्तिभावाने भारलेला काळ, या महिन्यात शिवपूजा, उपवास, अभिषेक, मंत्रजप या साऱ्याला खास महत्त्व असतं. विशेषतः श्रावणातले सोमवार हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जातात आणि या दिवशी व्रत केलं जातं. मात्र यंदा एक गोंधळ निर्माण झालाय, श्रावण २५ जुलैपासून सुरू होतोय की २६ जुलैपासून? हाच संभ्रम अनेकांच्या मनात आहे. चला तर मग, पाहूया यंदाचा श्रावण महिना नेमका कधीपासून सुरू होतोय आणि त्यातले खास सोमवार कोणते आहेत!
श्रावण कधीपासून सुरू होतोय?
उत्तर भारतात यंदा श्रावण ११ जुलैपासून सुरू झालाय. मात्र, महाराष्ट्रात श्रावण शुक्ल प्रतिपदेला, म्हणजेच २५ जुलै २०२५ (शुक्रवार) पासून सुरू होईल. कारण आषाढ अमावस्या २३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजून २८ मिनिटांनी सुरू झाली असून ती २४ जुलै रोजी १२ वाजून ४० मिनिटांनी संपत हॉट आहे. त्यामुळेच २५ जुलै पासून श्रावण मासाला सुरुवात होणार आहे. हा महिना २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण अमावस्येला संपेल.
यंदाचे श्रावणी सोमवार – लक्षात ठेवा या ४ तारखा
पहिला सोमवार: २८ जुलै
दुसरा सोमवार: ४ ऑगस्ट
तिसरा सोमवार: ११ ऑगस्ट
चौथा सोमवार: १८ ऑगस्ट
श्रद्धेने उपवास केल्यास आणि योग्य विधीने पूजा केल्यास, भोलेनाथ आपल्या मनोकामना पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे.
श्रावणी सोमवारचं व्रत कसं करतात?
व्रत कसं करायचं, यासाठी एक ठराविक नियम नाही. आपल्या श्रद्धेनुसार व्रत करता येतं:
काही लोक निर्जल (पाणीही न पिता) उपवास करतात.
काही फक्त पाणी किंवा फळं खाऊन उपवास करतात.
काहीजण एकभुक्त (दिवसातून फक्त एकदाच जेवण करणे) पद्धतही पाळतात.
सायंकाळी पूजा झाल्यावर सात्विक जेवण घेऊन व्रत सोडलं जातं.
कांदा-लसूण टाळणं हे या व्रतात अत्यावश्यक मानलं जातं.
सोमवारी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पांढरे वस्त्र घालून पूजेला बसावे. घरात शंकराची पिंड असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करून नंतर पिंडीला भस्म लावावे. बेल, पांढरी फुले पिंडीवर अर्पण करावीत. तसेच धूप, दीप, अगरबत्ती लावून महादेवांची पूजा करावी. यावेळी शिवचालीसा, शिव तांडव स्तोत्र, शिवलीलामृत किंवा शिवाशी संबंधित श्लोक वाचावेत. तसेच 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. शेवटी आरती करून देवांना नैवेद्य दाखवावा व सर्वांना प्रसाद वाटावा.