घराघरात रोज बनणारी चपाती दिसायला साधी असली तरी ती मऊ, फुललेली आणि चविष्ट बनवणं अनेकांना जमत नाही. अनेकदा पोळ्या कडक होतात किंवा फुगतच नाहीत. यामागचं मुख्य कारण म्हणजे कणीक मळण्याची पद्धत. कणीक योग्य पद्धतीने मळली तर साध्या गव्हाच्या पिठापासूनही अगदी हॉटेलसारख्या मऊ पोळ्या तयार होऊ शकतात.
कणकेत दूध घालण्याची सोपी ट्रिक
मऊ आणि छान फुललेल्या पोळ्यांसाठी पाण्याऐवजी थोडं दूध वापरण्याची पद्धत खूप उपयोगी ठरते. सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. त्यात थोडं थोडं दूध घालत कणीक मळायला सुरुवात करा. दूध एकदम जास्त घालू नका. हळूहळू मिसळत घट्ट आणि मऊसर कणीक तयार करा. साधारण पाच मिनिटं कणीक चांगली मळली तर पोळ्या फुगायला मदत होते.
कणीक मळताना घाई करू नका
कणीक मळताना दोन्ही हातांचा वापर करून ती नीट एकजीव करणे महत्त्वाचं असतं. कणीक मळून झाल्यावर लगेच पोळ्या लाटू नयेत. काही वेळ कणीक झाकून ठेवली तर ती सेट होते. त्यामुळे पोळ्या अधिक मऊ आणि फुगलेल्या होतात.
पाणी वापरत असाल तर ही पद्धत लक्षात ठेवा
जर तुम्ही पाण्याने कणीक मळत असाल तर पाणी हळूहळू घालणं गरजेचं आहे. अनेक जण एकदम जास्त पाणी घालतात आणि त्यामुळे कणीक बिघडते. थोडं थोडं पाणी घालत हाताने अंदाज घेत कणीक मळा. ही प्रक्रिया साधारण पाच ते सहा मिनिटं चालू ठेवा.
शेवटी थोडं तेल मिसळा
कणीक तयार झाल्यावर त्यात थोडंसं तेल मिसळून पुन्हा एकदा मळून घ्या. त्यामुळे कणीक मऊ राहते आणि पोळ्या छान फुगतात. योग्य पद्धतीने मळलेली कणीक वापरली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशा मऊ पोळ्या सहज बनू शकतात.