Soha Ali Khan Recipe : ऑक्टोबर हीटवर सोहाचा भन्नाट उपाय; काकडीपासून बनवा झटपट 'कुकुंबर बोट्स', पाहा Video

काकडी, घट्ट दही आणि कुरकुरीत चिप्स यांचा वापर करून तयार होणारा हा नाश्ता कमी वेळात बनवता येतो. विशेष म्हणजे, यासाठी गॅसचीही गरज नाही.
Soha Ali Khan Recipe : ऑक्टोबर हीटवर सोहाचा भन्नाट उपाय; काकडीपासून बनवा झटपट 'कुकुंबर बोट्स', पाहा Video
Soha Ali Khan Recipe : ऑक्टोबर हीटवर सोहाचा भन्नाट उपाय; काकडीपासून बनवा झटपट 'कुकुंबर बोट्स', पाहा Video(Photo - Instagram)
Published on: 

ऑक्टोबर हीटमुळे उकाडा वाढला की काहीतरी थंडगार, हलके आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते. अशा वेळी रोजच्या नाश्त्यापेक्षा काहीतरी वेगळे करून पाहायचे असेल, तर अभिनेत्री सोहा अली खानने शेअर केलेली 'कुकुंबर बोट्स' ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. काकडी, घट्ट दही आणि कुरकुरीत चिप्स यांचा वापर करून तयार होणारा हा नाश्ता कमी वेळात बनवता येतो. विशेष म्हणजे, यासाठी गॅसचीही गरज नाही.

सोहा अली खानने शेअर केली कुकुंबर बोट्सची रेसिपी

सोहा अली खानने १३ ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती काकडीपासून झटपट नाश्ता तयार करताना दिसते. मुंबईतील वाढत्या तापमानाचा उल्लेख करत तिने शरीराला पाण्याचा पुरवठा करणारा आणि बनवायला सोपा पदार्थ तयार करण्याचे ठरवल्याचे सांगितले.

Soha Ali Khan Recipe : ऑक्टोबर हीटवर सोहाचा भन्नाट उपाय; काकडीपासून बनवा झटपट 'कुकुंबर बोट्स', पाहा Video
कुरकुरीत कोबी पराठा बनवायचाय? 'या' ५ टिप्स ठेवा लक्षात

सोहाने या रेसिपीला 'कुकुंबर बोट्स' असे नाव दिले आहे. काकडीचे लांबीच्या दिशेने दोन भाग करून त्यातील बिया काढल्या जातात. त्यानंतर तयार झालेल्या खोलगट भागात मसाले घातलेले घट्ट दही भरले जाते. शेवटी त्यावर आवडीचे चिप्स घातले जातात. काकडीचा ताजेपणा, दह्याचा मलईदारपणा आणि चिप्सचा कुरकुरीतपणा यामुळे या पदार्थाला वेगळीच चव मिळते.

कुकुंबर बोट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ काकडी

  • १ कप घट्ट दही

  • आवडीनुसार चिप्स

  • १ लिंबू

  • लसूण पावडर

  • ओरेगॅनो

  • मीठ चवीनुसार

  • कोथिंबीर

कशी बनवाल सोहा अली खानची खास रेसिपी?

१. सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तिचे लांबीच्या दिशेने दोन भाग करा. चमच्याच्या मदतीने आतील बिया काढून टाका. यामुळे काकडीला छोट्या होडीसारखा आकार मिळेल.

२. दह्याचे मिश्रण बनवा : एका भांड्यात घट्ट दही घ्या. त्यात लसूण पावडर, ओरेगॅनो, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिसळा.

३. काकडीत दही भरा : तयार झालेले दह्याचे मिश्रण काकडीच्या खोलगट भागात चमच्याने भरा. मिश्रण काकडीमध्ये व्यवस्थित पसरवा.

४. वरून चिप्स घाला : आवडीचे चिप्स हाताने कुस्करून दह्याच्या मिश्रणावर घाला. यामुळे नाश्त्याला कुरकुरीत पोत मिळेल.

५. थंडगार सर्व्ह करा : कुकुंबर बोट्स तयार झाल्यानंतर लगेच सर्व्ह करा. अधिक ताजेतवाने चव हवी असल्यास काकडी आणि दही आधीच थंड करून ठेवा.

Soha Ali Khan Recipe : ऑक्टोबर हीटवर सोहाचा भन्नाट उपाय; काकडीपासून बनवा झटपट 'कुकुंबर बोट्स', पाहा Video
नाश्त्यासाठी बनवा ब्रोकोली-ओट्सचा पौष्टिक पराठा; वाचा सोपी रेसिपी

उकाड्यात हा नाश्ता ठरेल चांगला पर्याय

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, तर दह्यातून प्रथिने आणि कॅल्शियम मिळते. त्यामुळे काकडी आणि दही यांचे मिश्रण हलक्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. मात्र, चिप्समध्ये मीठ आणि चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना चिप्सचे प्रमाण मर्यादित ठेवता येईल.

मुंबईच्या उकाड्यात कमी वेळात काहीतरी चविष्ट आणि वेगळे बनवायचे असेल, तर सोहा अली खानची ही 'कुकुंबर बोट्स' रेसिपी नक्की करून पाहा.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in