

चायनीज आणि स्ट्रीट फूड खाण्याची इच्छा झाली की नेहमी बाहेर जाण्याची गरज नाही. घरच्या घरीही झटपट आणि चविष्ट हॉट चायनीज भेल तयार करता येते. कुरकुरीत फ्राय केलेले नूडल्स, ताज्या भाज्या आणि तिखट सॉसेस यांचे भन्नाट कॉम्बिनेशन या भेलला खास चव देते. गरमागरम सर्व्ह केल्यास तिची चव आणखी खुलते.
साहित्य :
उकडलेले नूडल्स - २ कप
पांढरी आणि हिरवी कांद्याची पात - १/२ कप
हिरवी शिमला मिरची - १ (बारीक चिरलेली)
कोबी - १/२ कप (बारीक चिरलेली)
टोमॅटो - १/२ कप (चिरलेला)
गाजर - १/२ कप (बारीक चिरलेले)
आले - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
लसूण - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
व्हिनेगर - १ टेबलस्पून
चिली सॉस - १ टेबलस्पून
सोया सॉस - १ टेबलस्पून
शेजवान सॉस - १ टेबलस्पून
टोमॅटो केचप - १ टेबलस्पून (ऐच्छिक)
तेल - २ टेबलस्पून
मीठ - चवीनुसार
कृती :
१. नूडल्स तळून घ्या - उकडलेले नूडल्स पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर ते गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी ते बाजूला ठेवा.
२. आले-लसूण परतून घ्या - कढईमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण घालून मोठ्या आचेवर परतून घ्या.
३. भाज्या परता - आता गाजर, कोबी, शिमला मिरची आणि कांद्याची पात घाला. सर्व भाज्या मोठ्या आचेवर सुमारे ३० सेकंद झटपट परतून घ्या.
४. सॉसेस घाला - त्यात शेजवान सॉस, चिली सॉस, सोया सॉस आणि व्हिनेगर घाला. तिखटपणा कमी हवा असल्यास टोमॅटो केचप घालू शकता. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून चवीनुसार मीठ घाला.
५. कुरकुरीत नूडल्स मिसळा - तळलेले नूडल्स हाताने थोडेसे कुस्करून कढईत मिक्स करा.
६. टोमॅटो घालून परता - आता चिरलेला टोमॅटो घाला. सॉस, भाज्या आणि नूडल्स चांगले एकत्र करा. सुमारे २ मिनिटे परता.
७. गरमागरम सर्व्ह करा - वरून थोडी कांद्याची पात घालून सजवा आणि हॉट चायनीज भेल लगेच गरमागरम सर्व्ह करा.
टिप्स :
नूडल्स तळण्यापूर्वी ते पूर्णपणे थंड आणि शक्यतो कोरडे असावेत, त्यामुळे ते अधिक कुरकुरीत होतात.
भाज्या जास्त शिजवू नका. त्या थोड्या क्रिस्पी राहिल्यास भेलची चव छान लागते.
शेजवान आणि चिली सॉस आधीच तिखट असतात, त्यामुळे मीठ आणि तिखटपणा चवीनुसार ॲड करा.
टोमॅटो केचप ऐच्छिक आहे. तिखटपणा कमी करण्यासाठी त्याचा वापर करू शकता.
नूडल्स मिसळल्यानंतर भेल जास्त वेळ ठेवू नका. लगेच सर्व्ह केल्यास ती अधिक कुरकुरीत लागते.