

कारल्याची भाजी म्हंटलं की, “कडू आहे, नाही आवडत” असं म्हणत नाक मुरडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण कारलं हे फक्त चवीसाठी नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवायला मदत होते, पचन सुधारते आणि पोटासाठी उपयोगी आहे. जर तुम्हालाही कारल्याची भाजी खायला आवडत नसेल, तर ही मसालेदार गावराण स्टाईलमध्ये भरलेली कारली नक्की ट्राय करा आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी!
साहित्य :
कारली - ६ ते ८ मध्यम आकाराची
कांदा - २ (बारीक चिरलेले)
शेंगदाण्याची पूड - ३ टेबलस्पून
नारळाचा कीस (कोरडा) - २ टेबलस्पून
धणे-जिरे पूड - २ टीस्पून
लाल तिखट - 1 टीस्पून
हळद - ½ टीस्पून
आमचूर पावडर / चिंचेचा कोळ - चवीनुसार
गूळ - १ ते २ टीस्पून
मीठ - चवीनुसार
तेल - ३ ते ४ टेबलस्पून
मोहरी, हिंग - फोडणीसाठी
कोथिंबीर - सजावटीसाठी
कृती :
सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून पुसून घ्या. प्रत्येक कारल्याला मध्ये उभी चीर देऊन आतील बिया काढा. त्यावर थोडं मीठ चोळून २० ते ३० मिनिटं बाजूला ठेवा. नंतर कारली पाण्याने धुवून हलक्याच पिळून घ्या, यामुळे कडूपणा कमी होतो. एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर शेंगदाण्याची पूड, कोरडा नारळ, धणे-जिरे पूड, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, गूळ आणि चवीनुसार मीठ घालून मसाला नीट परतून घ्या. हा मसाला थंड झाल्यावर तो प्रत्येक कारल्यात नीट भरून घ्या. मसाला बाहेर येऊ नये म्हणून हवे असल्यास कारली हलक्या दोऱ्याने बांधू शकता. आता कढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी फुटल्यानंतर हिंग घालून भरलेली कारली कढईत ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर १५-२० मिनिटं कारली शिजवा, मध्येच हलक्या हाताने उलटवा. कारली मऊ आणि छान सोनेरी रंगाची झाली की गॅस बंद करा. वरून कोथिंबीर भुरभुरवून गरमागरम चपाती, भाकरी किंवा वरण-भातासोबत सर्व्ह करा.
टिप्स :
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी उभ्या चिरीत मीठ लावून थोडा वेळ ठेवा.
मसाला नीट परतल्यावरच कारलीत भरा, त्यामुळे चव जास्त रुचकर लागते.
हलक्या आचेवर झाकण ठेवून शिजवल्यास कारली मऊ व सोनेरी होते.
गूळ घालल्यास कडूपणा कमी होऊन गोडसर मसाल्याची चव येते.