उन्हाळा वाढला की फक्त माणसांनाच नाही, तर कारलाही त्याचा फटका बसू लागतो. कडक ऊन, वाढते तापमान आणि तापलेले रस्ते याचा परिणाम कारच्या रंगापासून टायर, रबर पार्ट्स आणि इंजिनपर्यंत अनेक भागांवर होतो. वेळेवर काळजी घेतली नाही, तर पुढे दुरुस्तीसाठी मोठा खर्चही येऊ शकतो.
मात्र, काही सोप्या सवयी आणि वेळेवर केलेली तपासणी यामुळे कार उन्हाळ्यातही चांगली साथ देऊ शकते. अचानक बिघाड टाळायचा असेल आणि कार दीर्घकाळ व्यवस्थित ठेवायची असेल, तर या १० गोष्टींकडे नक्की लक्ष द्या.
रंग आणि बॉडीचे संरक्षण करा
जसं कडक उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरलं जातं, तसंच कारसाठी वॅक्स पॉलिश उपयोगी ठरतं. यामुळे कारच्या रंगावर आणि मेटलवर एक सुरक्षात्मक थर तयार होतो. त्यामुळे रंगाची झळाळी टिकून राहते आणि उष्णतेमुळे होणारे नुकसान कमी होते. विशेषतः एसयूव्हीवरील प्लास्टिक क्लॅडिंगला उन्हाळ्यात जास्त काळजीची गरज असते.
रबर पार्ट्सची नियमित तपासणी करा
उन्हाळ्यात रबरचे भाग लवकर खराब होऊ शकतात. खिडक्यांच्या चॅनेलसह इतर रबर पार्ट्समध्ये भेगा पडल्या आहेत का, हे तपासत राहा. हे भाग जुने झाले, तर पावसात किंवा धुण्यावेळी पाणी योग्य प्रकारे वाहून जात नाही. गरज वाटल्यास ते त्वरित बदलणं योग्य ठरतं.
टायरची स्थिती दुर्लक्षित करू नका
उष्णतेचा सर्वाधिक परिणाम टायरवर होतो. जुने टायर असतील, तर त्यावर सूक्ष्म भेगा पडू शकतात आणि त्या लगेच दिसूनही येत नाहीत. साधारणपणे टायरचा कालावधी पाच वर्षे किंवा ४० हजार किलोमीटरपर्यंत मानला जातो. टायरच्या साइडवॉलवर त्याची उत्पादन तारीख दिलेली असते. टायर नीट दिसत असले, तरी ते जुने असतील तर उष्णतेमध्ये फुटण्याचा धोका वाढतो.
टायरमधील हवा योग्य ठेवा
उन्हामुळे टायरमधील हवा फुगते. त्यामुळे टायरचे तापमान आणि दाब दोन्ही वाढू शकतात. आधीच टायरला भेगा असतील, तर जास्त दाबामुळे तो फुटण्याचा धोका निर्माण होतो. वेगात गाडी चालवत असताना हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात टायर प्रेशर योग्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
वेळेवर सर्व्हिसिंग करून घ्या
कारची वेळेवर सर्व्हिसिंग करणं उन्हाळ्यात विशेष गरजेचं असतं. इंजिन ऑईल उष्णतेमध्ये लवकर खराब होऊ शकतं. हे ऑईल इंजिनमधील घर्षण कमी करतं आणि अशुद्धता बाहेर काढण्यास मदत करतं. त्यामुळे त्याची वेळोवेळी तपासणी आणि बदल करणं इंजिनच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
बेल्ट आणि होजेस तपासा
सर्व्हिसिंगदरम्यान रबर बेल्ट आणि होजेस यांचीही तपासणी केली जाते. उष्ण आणि कोरड्या हवेमुळे हे भाग लवकर झिजतात. गाडी सुरू करताना कर्कश आवाज येत असेल किंवा भेगा दिसत असतील, तर हे खराब होण्याचे संकेत असू शकतात. कंपनीच्या वेळापत्रकानुसार टाइमिंग बेल्ट किंवा चेन बदलून घेणं योग्य ठरतं.
कूलंटची पातळी योग्य ठेवा
उन्हाळ्यात इंजिन थंड ठेवण्यासाठी कूलंटची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यामुळे कूलंट टँकमधील पातळी नियमित तपासा. ती कमी वाटल्यास डिस्टिल्ड वॉटर घालून ती योग्य पातळीवर ठेवता येते. यामुळे इंजिनचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
कार कव्हर आणि सनशेड वापरा
गाडी उन्हात उभी राहत असेल, तर कार कव्हर खूप उपयोगी ठरतं. यामुळे रंग आणि मेटल पार्ट्सचे संरक्षण होते. विंडशील्ड आणि काचांवर सनशेड लावल्यास गाडीच्या आतले तापमान काही प्रमाणात कमी राहते. त्यामुळे केबिनचं नुकसानही कमी होतं.
एसी सिस्टमची तपासणी करा
जसं घरातील एसीची उन्हाळ्यापूर्वी सर्व्हिसिंग केली जाते, तसंच कारच्या एसी सिस्टमची तपासणी करणंही गरजेचं आहे. कडक उन्हात प्रवास करताना योग्य कूलिंग मिळावं, यासाठी एसी व्यवस्थित काम करत आहे का, हे आधीच पाहणं फायद्याचं ठरतं.
गाडी सुरू करण्यापूर्वी काचा उघडा
ऊनात उभी असलेली कार आतून खूप तापते. अशावेळी गाडी सुरू करण्यापूर्वी काही वेळ काचा उघड्या ठेवल्या, तर आत अडकलेली गरम हवा बाहेर पडते. त्यामुळे एसीला केबिन थंड करण्यासाठी कमी वेळ लागतो.
थोडक्यात काय तर उन्हाळ्यात कारची काळजी घेण्यासाठी फार अवघड किंवा खर्चिक उपाय करण्याची गरज नसते. वेळेवर तपासणी, योग्य देखभाल आणि काही साध्या सवयी यामुळे कारचं आरोग्य चांगलं राहू शकतं. थोडी काळजी घेतली, तर उन्हाळ्यातही कारची कामगिरी उत्तम राहू शकते.