
उन्हाळा सुरू होताच अनेकांना त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. यामध्ये उन्हामुळे चेहरा आणि हात पायाची त्वचा टॅन (Skin Tanning) होणे ही प्रमुख समस्या आहे. याशिवाय त्वचेला जळजळ होणे, लालसर पडणे अशाही समस्या निर्माण होतात. यासाठी तुम्ही घरच्या घरी कोणताही केमिकल न वपारता फेसपॅक बनवू शकता. तसेच फेसपॅक लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करण्यासाठी देखील नैसर्गिक रेमेडिजचा अवलंब करू शकता.
त्वचेला क्लिन्सरने स्वच्छ करणे
उन्हातून आल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर तुमच्या त्वचेला तसेच चेहऱ्याला सुटेबल क्लिन्सरने त्वचेला स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन थोड्या प्रमाणात कमी होते.
स्क्रब करणे
स्क्रबिंगमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. मात्र, बाजारात उपलब्ध स्क्रबमध्ये रासायनिक घटक असतात त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही पारंपारिक उटण्याचा वापर करू शकता. उटणे शक्यतो आपल्याला दिवाळी सणालाच आठवते. मात्र, जुन्या काळात उटण्याने आंघोळ करणे हे नित्याचेच होते. सुगंधित उटणे हे सर्वोत्तम नैसर्गिक स्क्रब असते. त्यामुळे ज्या-ज्या भागात तुमची त्वचा टॅन झाली आहे. तिथे तिथे तुम्ही उटण्याने मसाज करून खोलवर त्वचा स्वच्छ करून घ्या.
हे ही वाचा
फेसपॅकचा वापर करा
उटण्याने स्क्रब केल्यानंतर त्वचेची बारीक छिद्र मोकळी होतात. त्यामुळे फेसपॅक लावून ती पुन्हा बंद करणे आवश्यक आहे. तुम्ही घरच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक बनवून लावू शकता. यामध्ये लिंबू, मध, एलोवेरा जेल, बेसन पीठ, हळद, दही इत्यादींचा फेसपॅक करू शकता.
फेसपॅक बनवण्याची पद्धत
१ एक चमचा एलोवेरा जेलमध्ये (कोरफडचा ताजा गर असेल तर जास्त चांगले) एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दही मिसळून तो पॅक चेहऱ्यावर लावा. लिंबू तुमच्या त्वचेवरील काळवंडलेपणा कमी करते. दही त्वचेचे पोषण करते तर एलोवेरा किंवा कोरफड तुमची त्वचा मुलायम बनवते. तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तेव्हा या पॅकचा उपयोग करावा. कोरड्या त्वचेसाठी दही, बेसनचा उपयोग करू नये.
२. दही, लिंबू, बेसनपीठापासून तेलकट त्वचेसाठी उत्तम फेसपॅक तयार होतो. बेसनपीठात दही मिसळा, त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा, त्यात एक चमचा हळद घाला हा पॅक चेहऱ्यावर तसेच टॅन झालेल्या त्वचेवर लावावा. यामुळे टॅनतर निघेलच सोबतच त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा देखील कमी होईल आणि मिळेल सुंदर त्वचा.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)