

कैरीचं पन्हं ही उन्हाळ्यात बनवले जाणारे एक पारंपारिक भारतीय पेय आहे. हे पेय महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. उत्तर भारतातही हे काही ठिकाणी बनवले जाते. त्याला आम पन्ना असे नाव आहे. कैरीचं पन्हं हे शीतपेयाला एक चांगला पर्याय आहे. एक उत्तम उन्हाळी पेय (Summer Drink) म्हणून कैरीचं पन्हं ओळखलं जातं. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया आंबट, गोड, वेलचीयुक्त शरीराला गारवा देणारं कैरीचं पन्हं कसं बनवतात. काय आहे याची रेसिपी...
उन्हाळा विशेष कैरीचं पन्हं बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• ३ कैऱ्या
• १ कप गूळ
• १/४ चमचा वेलची पूड
• चिमूटभर मीठ (ऐच्छिक)
• पाणी
तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार आवश्यकतेप्रमाणे या प्रमाणात बदल करू शकता. फक्त प्रमाणात अचुकता असू द्या.
हे ही वाचा :
कृती
पहिले कैऱ्या छान धुवून घ्या. कैऱ्यांना सुरीने हलकेच काप द्या. (पूर्ण कापू नये) नंतर कैरी उकडून घ्या. उकळलेल्या कैऱ्यांचा गर (पल्प) काढून घ्या. यामध्ये गूळ घाला. चमच्याने गूळ आणि कैरीचा पल्प एकजीव करून घ्या. त्यात वेलची पूड घाला. नंतर हा पल्प चहाच्या गाळणीतून गाळून घ्या. त्यात चिमुटभर मीठ घाला. हा पल्प हवाबंद बरणीत भरून ठेवल्यास किमान महिनाभर चांगला राहतो. आता एक चमचा पल्प ग्लासमध्ये टाका आणि त्यात पाणी घालून चमच्याने चछान ढवळून घ्या. मिश्रण एकजीव होऊ द्या. चविष्ट, गार आरोग्यदायी पन्हं तयार आहे. बरणीत भरून ठेवलेला पल्प कधीही तुम्ही पन्हं करण्यासाठी वापरू शकतात. एक चमचा पल्प आणि ग्लासभर पाणी असे प्रमाण ठेवून झटपट कैरी पन्हं तयार करता येते.