खूप खाल्ले बटाटा अन् केळ्याचे चिप्स, आता ट्राय करा सुरणाचा कुरकुरीत स्नॅक; महिनाभर टिकतील, वाचा 'सीक्रेट रेसिपी'
बटाट्याचे किंवा केळ्याचे चिप्स खाऊन कंटाळा आलाय? संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळं, चवदार आणि थोडंसं हेल्दी हवंय का? तर आता बाजारातल्या पॅकेट्सला बाय-बाय करा. भारतीय स्वयंपाकघरात पूर्वापार वापरला जाणारा सुरण आता नव्या अवतारात, कुरकुरीत मसाला चिप्स म्हणून तुमच्या ताटात येणार आहे.
सुरण म्हटलं की अनेकांना खाज, कडूपणा किंवा त्रासाची आठवण येते. पण योग्य पद्धतीने साफ करून शिजवला, तर सुरण चवीला अफलातून आणि पचायला हलका ठरतो. फायबर, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला सुरण पचन सुधारतो आणि शरीराला ऊर्जा देतो.
सुरणाचे चिप्स का खास?
चहासोबत स्नॅक म्हणून, जेवणात साइड डिश म्हणून किंवा फराळात काहीतरी वेगळं म्हणून सुरणाचे चिप्स उत्तम लागतात. योग्य मसाल्यांचे प्रमाण आणि तेलाचं योग्य तापमान ठेवलं की हे चिप्स बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसर होतात.
साहित्य
सुरण - २५० ग्रॅम
चिंचेचे पाणी - २ चमचे
मीठ - चवीनुसार
हळद - ½ चमचा
लाल तिखट - १ चमचा
धणे-जिरे पूड - १ चमचा
तांदळाचे पीठ किंवा रवा - २ चमचे
तेल - तळण्यासाठी
कृती
सुरण सोलताना हाताला थोडं तेल लावा. सोललेला सुरण पातळ गोल काप करा.
हे काप 10–15 मिनिटं चिंचेच्या पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे खाज येत नाही.
नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन काप पूर्ण कोरडे करून घ्या.
एका भांड्यात सुरणाचे काप, मीठ, हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घालून नीट मिसळा.
त्यावर तांदळाचे पीठ किंवा रवा घालून हलक्या हाताने मिक्स करा.
कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल तयार झाल्यावर चिप्स एकेक करून सोडा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
टिश्यू पेपरवर काढून ठेवा, जेणेकरून जास्त तेल निघून जाईल.
टिप्स आणि ट्विस्ट
अधिक मसालेदार चव हवी असल्यास पेरी-पेरी मसाला घालू शकता.
चिप्स पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवल्यास ते महिनाभर खमंग राहतात.
गरमागरम सुरणाचे मसाला चिप्स चहा किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा आणि रोजच्या बटाटा-केळ्याच्या चिप्सपेक्षा वेगळा, हेल्दी पर्याय अनुभवून पाहा.
