
उत्तम झोप आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. मात्र, आजच्या ओटीटी, रिल्स, चित्रपट, बातम्या, मनोरंजन इत्यादी सर्वकाही स्मार्ट फोन किंवा टॅबलेटवर पाहता येत आहे. त्यामुळे डिजिटल युगात स्क्रीन पासून लांब राहणे हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. याचे गंभीर दुष्परिणाम आरोग्यावर होत आहे. यामध्ये डिजिटल आय स्ट्रेन हे तर प्रामुख्याने आहेच मात्र याशिवाय डोके दुखी आणि अन्य त्रासही जडत आहे. तर अलिकडच्या काही संशोधनानुसार सातत्याने स्क्रीन समोर असल्याने अनेकांच्या झोपेच्या वेळेवर परिणाम झालाय. तसेच यामुळे निद्रानाश होत असल्याचे अभ्यासातून दिसून येत आहे.
निद्रानाश म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्हाला दिवसभराच्या कामानंतर अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागत नाही. झोप येण्यासाठी किमान अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. तेव्हा तुम्हाला निद्रानाश झाला आहे, असे म्हणता येते. डिजिटल युगात स्मार्ट फोनच्या अत्याधिक वापरामुळे निद्रानाश होत असल्याचे विविध अभ्यासातून समोर आले आहे.
काय आहेत मुख्य कारणे?
निळा प्रकाश
टीव्ही, लॅपटॉप, टॅब, मोबाईल, अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश मेलाटोनिन नावाचे हार्मोन निर्माण करण्यासाठी अडथळे निर्माण करतो. मेलाटोनिन हे हार्मोन झोप येण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या झोपण्याच्या वेळेपूर्वी मोबाईल पाहण्यामुळे मेंदूला झोपण्याचे संकेत मिळत नाही. परिणामी निद्रानाश जडतो.
कॉर्टिसोल हार्मोन
एकीकडे मेलाटोनिनची निर्मिती होत नाही. तर दुसरीकडे सकाळी झोपेतून उठताना तुमचा ताणतणाव व्यवस्थापित करणारे कॉर्टिसोल हार्मोन सक्रिय राहते. हे हार्मोन सक्रिय राहिल्यामुळे देखील मेंदूला योग्य ते संकेत मिळत नाही. मेंदूला असे वाटते की अद्यापही दिवसच आहे. त्यामुळेही झोपेत अडथळे निर्माण होतात.
काय उपाय करणार?
रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप किंवा अन्य कोणतेही डिजिटल उपकरण वापरू नका.
दिवसभरातील स्क्रीनटाईम कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्या.
हे ही वाचा -
स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी वेगवेगळे छंद जोपासणे, पुस्तक वाचणे, व्यायाम करणे, योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा करणे इत्यादी गोष्टींवर भर द्या.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)