
महिलांच्या चेहऱ्यावर वारंवार येणारे केस एक मोठी समस्या बनतात. अनेकदा हे आनुवंशिक कारणांमुळे होते, तर कधी कधी हार्मोनल बदलांमुळे. काहींच्या चेहऱ्यावर हलके केस असतात, जे फार त्रास देत नाहीत, पण अनेकांना जाड आणि घन केसांचा सामना करावा लागतो. असे नको असलेले केस काढण्यासाठी आपण शेविंग किंवा वॅक्सिंग करतो. पण यानंतर त्वचेवर अनेक समस्या दिसू लागतात. जसे की, कधी त्वचा लालसर होते, कधी लहान- लहान पुरळ येतात, तर कधी खाज सुटते. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न हा असतो की, शेवटी कोणता उपाय अवलंबावा ज्यामुळे त्वचेला नुकसान न करता या केसांपासून मुक्तता मिळू शकेल. याच प्रश्नाचे उत्तर स्किन स्पेशालिस्ट डॉ. जावेरिया आतिफ यांनी आपल्या इनस्टाग्राम व्हीडिओद्वारे दिले आहे.
रेझर किंवा लेझर हे दोन्ही पर्याय उत्तम
डॉ. जावेरिया यांनी त्यांच्या इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या म्हणतात, "चेहऱ्यावरील केसांपासून कायमची सुटका हवी असेल तर रेझर किंवा लेझर हे दोन्ही पर्याय चांगले ठरतात. रेझर वापरून घरीच सहज केस काढता येतात. मुख्य म्हणजे त्यात कोणतीही वेदना होत नाही आणि त्वचेलाही इजा पोहोचत नाही."
त्या पुढे म्हणाल्या," लेझर ट्रीटमेंट मात्र अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारी आहे. यामुळे केसांची वाढ कमी होते, त्वचेवर जळजळ होत नाही आणि त्वचेचा पोतही निरोगी राहतो. जरी लेझर ट्रीटमेंट थोडी महागडी असली तरी त्वचेसाठी हा सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो."