वॉटर प्युरिफायर लावला म्हणजे पाणी शुद्ध येतं असं वाटतं? कदाचित तुम्हीही करता 'या' चुका

घरात वॉटर प्युरिफायर आहे, त्यामुळे पाणी सुरक्षित आहे, असं आपण सगळेच गृहीत धरतो. रोज नळाचं पाणी भरतो, पितो आणि फारसा विचार करत नाही. पण कधी लक्ष दिलंय का की पाणी शुद्ध असलं, तरी आपल्या रोजच्या काही सवयींमुळे ते पुन्हा खराब होऊ शकतं?
वॉटर प्युरिफायर लावला म्हणजे पाणी शुद्ध येतं असं वाटतं? कदाचित तुम्हीही करता 'या' चुका
Photo : Pintrest
Published on

घरात वॉटर प्युरिफायर आहे, त्यामुळे पाणी सुरक्षित आहे, असं आपण सगळेच गृहीत धरतो. रोज नळाचं पाणी भरतो, पितो आणि फारसा विचार करत नाही. पण कधी लक्ष दिलंय का की पाणी शुद्ध असलं, तरी आपल्या रोजच्या काही सवयींमुळे ते पुन्हा खराब होऊ शकतं? पाणी साठवण्याची पद्धत, फिल्टरची देखभाल किंवा नळाची स्वच्छता या छोट्या गोष्टींकडे आपण नकळत दुर्लक्ष करतो. आणि याच चुका हळूहळू आरोग्यावर परिणाम करू लागतात.

याच पार्श्वभूमीवर युरेका फोर्ब्सचे चीफ वॉटर सायंटिस्ट डॉ. अनिल कुमार यांनी पाण्याच्या सुरक्षिततेबाबत ७ सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स लक्षात ठेवल्यास आपण वापरत असलेलं पाणी खरंच सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करता येऊ शकते.

१) घरात येणारं पाणी कुठून येतं हे तपासा

घरात येणारं पाणी नेमकं कुठून येतं, याकडे आपण सहसा लक्ष देत नाही. नळातून येणारं पाणी नगरपालिका पुरवते की बोअरवेलचं आहे, टँकरमधून येतं की विहिरीचं याची स्पष्ट माहिती अनेकांना नसते. पाण्याचा स्रोत बदलला की त्यातील घटकही बदलतात. कुठे मीठ जास्त असतं, कुठे रसायनं, तर कुठे जंतुसंसर्गाचा धोका असतो. स्रोत समजून घेतल्याशिवाय आपण पाण्याबाबत योग्य काळजी घेतोय असं म्हणता येत नाही.

वॉटर प्युरिफायर लावला म्हणजे पाणी शुद्ध येतं असं वाटतं? कदाचित तुम्हीही करता 'या' चुका
स्वयंपाकघर स्वच्छ ठेवता? आधी 'या' ३ गोष्टी खरंच साफ आहेत का ते पाहा

२) पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासा

पाण्याची तपासणी हा असा विषय आहे, जो बहुतांश घरांमध्ये वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहतो. पाणी दिसायला स्वच्छ आहे म्हणजे ते पिण्यायोग्य आहे, असा समज आपण करून घेतो. पण पाण्यातील घातक घटक डोळ्यांना दिसत नाहीत. वर्षातून किमान एकदा पाण्याची तपासणी केली, तर पाण्यात मीठ जास्त आहे का, नायट्रेट्स आहेत का, किंवा जंतूंचा धोका आहे का हे कळू शकतं. अंदाजावर पाणी पिण्यापेक्षा खात्री करून पिणं केव्हाही चांगलं.

३) योग्य वॉटर प्युरिफायर निवडा

अनेक घरांमध्ये प्युरिफायर घेताना फक्त "ब्रँड चांगला आहे" किंवा "ऑफरमध्ये मिळाला" एवढाच विचार केला जातो. पण सगळ्या प्रकारच्या पाण्यासाठी एकच प्युरिफायर योग्य नसतो. कुठे पाणी खूप खारट असतं, तर कुठे गढूळ. काही ठिकाणी पावसाळ्यात पाणी जास्त खराब होतं. आपल्या भागात पाण्याची समस्या नेमकी काय आहे, हे समजून घेऊनच प्युरिफायर निवडायला हवा. नाहीतर पाणी पूर्णपणे शुद्ध होत नाही.

आरओ (RO):
जर तुमच्या भागात पाणी खूप खारट असेल, म्हणजे पाण्यात मीठ किंवा रसायनं जास्त असतील, तर आरओ प्युरिफायर गरजेचा असतो. बोअरवेलचं पाणी वापरणाऱ्या घरांमध्ये आरओ उपयुक्त ठरतो, कारण तो पाण्यातील घातक घटक मोठ्या प्रमाणात काढून टाकतो.

यूव्ही (UV):
पाणी दिसायला स्वच्छ असतं, पण त्यात जंतू, बॅक्टेरिया किंवा व्हायरस असू शकतात. अशा वेळी यूव्ही प्युरिफायर उपयोगी ठरतो. तो पाण्यातील जंतुसंसर्ग नष्ट करतो, पण पाण्यातील मीठ किंवा रसायनं काढत नाही.

यूएफ (UF):
जर पाणी गढूळ असेल, चिखल किंवा कण असतील, आणि वीज उपलब्ध नसेल, तर यूएफ प्युरिफायर चांगला पर्याय ठरतो. तो पाण्यातील मोठे कण काढतो, पण मीठ किंवा रसायनांवर परिणाम करत नाही.

म्हणजेच, आपल्या भागातील पाण्याची समस्या काय आहे, हे समजून घेतल्याशिवाय प्युरिफायर निवडू नये.

४) प्युरिफायरची नियमित देखभाल करा

प्युरिफायरची देखभाल हा आणखी एक दुर्लक्षित मुद्दा आहे. पाणी येतंय म्हणजे सगळं ठीक आहे, असं आपण समजतो. पण आतले फिल्टर वेळेवर बदलले नाहीत, तर तेच घाण साठवायला लागतात. हळूहळू ते पाणी शुद्ध करण्याऐवजी त्यात जंतू वाढवू शकतात. फिल्टर बदलण्याची वेळ लक्षात ठेवणं आणि नियमित सर्व्हिसिंग करणं हे पाण्याच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचं आहे.

५) शुद्ध पाणी योग्य प्रकारे साठवा

प्युरिफायरमधून आलेलं पाणी स्वच्छ असलं, तरी ते साठवताना आपण अनेक चुका करतो. अनेकदा बाटल्या नीट धुतलेल्या नसतात, झाकण नसलेली भांडी वापरली जातात किंवा हात थेट पाण्यात घातला जातो. अशा सवयींमुळे शुद्ध पाणी पुन्हा दूषित होतं. पाणी ज्या भांड्यात ठेवतो, त्याची स्वच्छता राखणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

६) नळ, टॅप आणि पाण्याचे आउटलेट सुरक्षित ठेवा

प्युरिफायरचा नळ, टॅप किंवा पाणी बाहेर येणारं आउटलेट ही ठिकाणं कायम उघड्या जागेत असतात. हातांचा वारंवार स्पर्श, धूळ, ओलावा यामुळे तिथे जंतू साचू शकतात. आपण प्युरिफायर साफ करतो, पण नळाकडे दुर्लक्ष करतो. परिणामी शुद्ध पाणी नळातून बाहेर येतानाच पुन्हा दूषित होऊ शकतं. आठवड्यातून एकदा तरी या भागांची साफसफाई करणं गरजेचं आहे.

वॉटर प्युरिफायर लावला म्हणजे पाणी शुद्ध येतं असं वाटतं? कदाचित तुम्हीही करता 'या' चुका
ब्लॅकहेड्समुळे जातेय चेहऱ्याची शोभा? घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय अन् मिळवा नितळ त्वचा

७) ऋतूच्या बदलानुसार अधिक काळजी घ्या

ऋतू बदलले तरी पाण्याबाबतच्या आपल्या सवयी मात्र बदलत नाहीत. पावसाळ्यात पाण्यात जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो, तर उन्हाळ्यात पाण्यात मीठ आणि घातक घटक वाढू शकतात. पण आपण वर्षभर तीच पद्धत वापरत राहतो. ऋतूनुसार थोडी अधिक काळजी घेतली, तर अनेक आजार टाळता येतात.

शेवटी एवढंच लक्षात ठेवा

घरात प्युरिफायर असणं ही सुरुवात आहे, शेवट नाही. पाणी कुठून येतं, कसं तपासलं जातं, कसं साठवलं जातं आणि कधी देखभाल केली जाते या सगळ्या गोष्टी मिळूनच पाणी खरंच सुरक्षित बनतं. थोडीशी जाणीव आणि काही सवयी बदलल्या, तर पाण्यामुळे होणारे आजार घरापासून दूर ठेवणं नक्कीच शक्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in