

WhatsApp युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एखादा मेसेज पाठवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत बसण्याची गरज भासणार नाही. कारण व्हॉट्सॲप लवकरच दोन नवे फीचर्स आणत आहे. यामध्ये मेसेज आधीच टाइप करून तो ठरलेल्या वेळी पाठवण्याची सुविधा आणि एकदाच पाहता येणारा टेक्स्ट मेसेज पाठवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही सुविधांमुळे मेसेज पाठवण्याचा अनुभव अधिक सोपा आणि खासगी होणार आहे. सध्या या फीचर्सची चाचणी सुरू असून टप्प्याटप्प्याने ते युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
शेड्युल मेसेज फीचर नेमकं काय आहे?
अनेकदा एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता द्यायच्या असतात किंवा एखादा महत्त्वाचा मेसेज ठरावीक वेळी पाठवायचा असतो. मात्र, त्या वेळी जागे राहणे शक्य होत नाही. अशा वेळी व्हॉट्सॲपचे नवे 'शेड्युल मेसेज' फीचर उपयोगी पडणार आहे.
या सुविधेमुळे युजर्सना मेसेज पाठवण्याची तारीख आणि वेळ आधीच निवडता येईल. त्यानुसार ठरलेल्या वेळी मेसेज आपोआप पाठवला जाईल. वैयक्तिक चॅटसोबतच ग्रुपमध्येही ही सुविधा वापरता येणार आहे. केवळ टेक्स्ट मेसेजच नाही, तर फोटो आणि व्हिडीओदेखील शेड्युल करता येतील.
मिळालेल्या माहितीनुसार, किमान १० मिनिटांनंतरपासून ते पुढील दोन आठवड्यांपर्यंत मेसेज पाठवण्याची वेळ निश्चित करता येणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, मेसेज पाठवण्याच्या वेळी तुमचा मोबाइल इंटरनेटशी कनेक्ट असण्याचीही गरज भासणार नाही.
शेड्युल केलेला मेसेज बदलता किंवा हटवता येणार?
शेड्युल केलेला मेसेज पाठवण्यापूर्वी त्यात बदल करण्याची किंवा तो हटवण्याची सुविधाही मिळणार आहे. चॅटच्या माहिती विभागात शेड्युल केलेल्या मेसेजसाठी स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे. येथून युजर्सना पाठवण्यासाठी निश्चित केलेला मेसेज पाहता येईल किंवा गरजेनुसार तो रद्द करता येईल.
सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. WABetaInfo या व्हॉट्सॲपमधील नव्या अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या संकेतस्थळाने आयओएसच्या बीटा आवृत्तीत ही सुविधा आढळल्याची माहिती दिली आहे. अँड्रॉइडवरही तिची चाचणी सुरू आहे.
व्हॉट्सॲपनेही दिले फीचरचे संकेत
या नव्या सुविधेबाबत व्हॉट्सॲपनेही संकेत दिले आहेत. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजर्सने शेड्युल मेसेज फीचरबाबत पोस्ट केली होती. या पोस्टला उत्तर देताना व्हॉट्सॲपने 'यावर काम सुरू आहे', असे म्हटले. त्यामुळे लवकरच हे फीचर अधिकृतपणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सॲपवर मेसेज शेड्युल कसा कराल?
हे फीचर तुमच्या खात्यावर उपलब्ध झाल्यानंतर पुढील पद्धतीने त्याचा वापर करता येईल.
सर्वप्रथम व्हॉट्सॲपवर ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपला मेसेज पाठवायचा आहे, तो चॅट निवडा.
त्यानंतर मेसेज टाइप करा किंवा फोटो-व्हिडीओ जोडायचा असल्यास तो निवडा.
मेसेज पाठवण्याच्या बटणावर काही वेळ बोट दाबून ठेवा.
स्क्रीनवर 'शेड्युल मेसेज' हा पर्याय दिसल्यास त्यावर क्लिक करा.
मेसेज पाठवण्याची तारीख आणि वेळ निवडा.
शेवटी शेड्युल निश्चित करा. ठरलेल्या वेळी तुमचा मेसेज आपोआप पाठवला जाईल.
आता टेक्स्ट मेसेजही एकदाच पाहता येणार!
व्हॉट्सॲपच्या दुसऱ्या नव्या फीचरचीही सध्या चर्चा सुरू आहे. आतापर्यंत 'व्ह्यू वन्स' हा पर्याय फोटो, व्हिडीओ आणि व्हॉइस नोट्ससाठी उपलब्ध होता. मात्र, आता ही सुविधा टेक्स्ट मेसेजसाठीही मिळणार आहे.
या फीचरच्या मदतीने पाठवलेला मेसेज समोरची व्यक्ती केवळ एकदाच पाहू शकेल. मेसेज उघडल्यानंतर तो पुन्हा पाहता येणार नाही. तसेच तो कॉपी किंवा फॉरवर्ड करण्यावरही मर्यादा असतील. या सुविधेत स्क्रीनशॉट घेण्यावरही प्रतिबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या अँड्रॉइडच्या बीटा आवृत्ती २.२६.४५.६ मध्ये या फीचरची चाचणी सुरू असल्याचे WABetaInfo ने म्हटले आहे. आयफोन युजर्ससाठीही ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात आहे.
'व्ह्यू वन्स' आणि 'डिसअपिअरिंग मेसेजेस' मध्ये काय फरक?
व्हॉट्सॲपवर आधीपासून उपलब्ध असलेल्या 'डिसअपिअरिंग मेसेजेस' आणि नव्या 'व्ह्यू वन्स' फीचरमध्ये फरक आहे. डिसअपिअरिंग मेसेजेस सुरू केल्यास ठरावीक कालावधीनंतर चॅटमधील मेसेज आपोआप हटवले जातात. यासाठी २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवसांचा पर्याय निवडता येतो.
दुसरीकडे, 'व्ह्यू वन्स'मध्ये मेसेज एकदा उघडून पाहिल्यानंतर तो अदृश्य होतो. त्यामुळे एखादी खासगी माहिती किंवा केवळ एकदाच दाखवायचा मजकूर पाठवण्यासाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
कधी मिळणार हे फीचर्स?
व्हॉट्सॲपची ही दोन्ही फीचर्स सध्या चाचणीच्या टप्प्यात आहेत. काही बीटा युजर्सना त्यांचा वापर करता येत असला, तरी सर्व अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी ही सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही. येत्या काळात टप्प्याटप्प्याने अधिक युजर्सना या फीचर्सचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.