डिसेंबर महिना सुरू होताच रस्ते, दुकाने आणि घरे रोषणाईने उजळून निघतात. नाताळच्या सजावटीने संपूर्ण वातावरण बदलून जाते. ख्रिसमस हा जगभर साजरा केला जाणारा प्रमुख सण असून, विशेषतः ख्रिश्चन धर्मीयांसाठी तो अत्यंत पवित्र मानला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. मात्र, हा सण याच दिवशी का साजरा केला जातो, यामागील इतिहास आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.
ख्रिसमस म्हणजे काय?
ख्रिसमस हा येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा सण आहे. ख्रिश्चन श्रद्धेनुसार, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तांचा जन्म एका गोठ्यात झाला. मेरी आणि जोसेफ यांना पुत्ररत्न लाभले. त्यांच्या जन्मावेळी देवदूत प्रकट झाले, कॅरोल्स गायले गेले आणि मेंढपाळांनी येऊन त्यांचे पूजन केले, अशी धार्मिक कथा आहे.
२५ डिसेंबरलाच ख्रिसमस का?
ख्रिश्चन परंपरेनुसार, येशू ख्रिस्त हे ईश्वराचे पुत्र आणि मानवतेचे तारणहार (Messiah) होते. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. ‘Christmas’ हा शब्द Old English मधील ‘Cristes Maesse’ या शब्दावरून आला असून त्याचा अर्थ ‘ख्रिस्ताची प्रार्थना (Mass)’ असा होतो. ख्रिसमसला ‘Nativity’ असेही म्हणतात.
जगभर ख्रिसमस कसा साजरा होतो?
ख्रिसमस या सणाच्या दिवशी सुट्टी असल्याने या दिवशी अनेक देशांमध्ये शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद असतात. मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना (Midnight Mass), कुटुंबासोबत खास ख्रिसमस डिनर, भेटवस्तू आणि शुभेच्छा कार्ड्सची देवाणघेवाण, ख्रिसमस कॅरोल्स आणि गाणी, ख्रिसमस ट्री, दिवे, सजावटीचे हार, तारे यांची सजावट करत जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. परंपरा देशागणिक बदलत असल्या तरी आनंद, प्रेम, क्षमा आणि एकतेचा संदेश हा ख्रिसमसचा मूळ गाभा आहे.