World Brain Tumor Day 2026 : झोपेचा अभाव ठरू शकतो धोकादायक; मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

मोबाईल फोनचा वापर, विशिष्ट आहार किंवा दैनंदिन पर्यावरणीय घटक यांचा ब्रेन ट्यूमरशी थेट संबंध असल्याचे ठोसपणे सिद्ध झालेले नाही. तरीही...
World Brain Tumor Day 2026 : झोपेचा अभाव ठरू शकतो धोकादायक; मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
World Brain Tumor Day 2026 : झोपेचा अभाव ठरू शकतो धोकादायक; मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? वाचा तज्ज्ञ काय सांगतात'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा मेंदूच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जीवनशैलीचा मेंदूच्या आरोग्यावर आणि ब्रेन ट्यूमरच्या जोखमीवर काही परिणाम होतो का? बहुतेक ब्रेन ट्यूमरची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. याबाबत बीडीआर फार्मास्युटिकल्सचे टेक्निकल डायरेक्टर डॉ. अरविंद बडीगर यांनी माहिती दिली.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?

ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागात पेशींची असामान्य वाढ होणे. ब्रेन ट्यूमरचे दोन प्रमुख प्रकार असतात, सौम्य (Benign) आणि घातक (Malignant). काही गाठी थेट मेंदूमध्ये निर्माण होतात, तर काही शरीरातील इतर अवयवांमधील कर्करोगामुळे मेंदूपर्यंत पसरतात.

World Brain Tumor Day 2026 : झोपेचा अभाव ठरू शकतो धोकादायक; मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
चहा-कॉफीऐवजी सकाळी प्या नारळपाणी; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

ब्रेन ट्यूमरचे धोक्याचे घटक कोणते?

फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या काही आजारांमध्ये धूम्रपान हा महत्त्वाचा धोक्याचा घटक असतो. मात्र, जीवनशैली आणि ब्रेन ट्यूमर यांच्यातील संबंध अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेला नाही.

तज्ज्ञांच्या मते, उच्च प्रमाणातील आयोनायझिंग रेडिएशनचा संपर्क, काही आनुवंशिक विकार (Genetic Syndromes) आणि वाढते वय हे ब्रेन ट्यूमरशी संबंधित महत्त्वाचे धोक्याचे घटक मानले जातात.

मोबाईल फोनचा वापर, विशिष्ट आहार किंवा दैनंदिन पर्यावरणीय घटक यांचा ब्रेन ट्यूमरशी थेट संबंध असल्याचे अद्याप ठोसपणे सिद्ध झालेले नाही. तरीही निरोगी जीवनशैलीचा अवलंब मेंदूच्या तसेच संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या

फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, सुकामेवा आणि प्रथिनेयुक्त पदार्थ मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक पुरवतात. या पदार्थांमधील अँटिऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण देण्यास मदत करतात.

World Brain Tumor Day 2026 : झोपेचा अभाव ठरू शकतो धोकादायक; मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
World Brain Tumor Day 2026 : सततचा थकवा, डोकेदुखीकडे दुर्लक्ष करताय? मेंदूतील ट्यूमरची असू शकतात 'ही' लक्षणे; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. व्यायाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.

पुरेशी झोप घ्या

मेंदूच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी झोप अत्यंत आवश्यक असते. सतत झोपेचा अभाव राहिल्यास भविष्यात स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

धूम्रपान टाळा, मद्यपान मर्यादित ठेवा

तंबाखूचे सेवन अनेक प्रकारच्या कर्करोगांशी तसेच हृदयविकारांशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे अतिमद्यपानामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे धूम्रपान टाळणे आणि मद्यपान मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

ताणतणावाचे व्यवस्थापन करा

दीर्घकालीन ताणतणावाचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ध्यानधारणा, नियमित व्यायाम आणि सामाजिक संबंध जपणे यामुळे ताण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

World Brain Tumor Day 2026 : झोपेचा अभाव ठरू शकतो धोकादायक; मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय कराल? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Summer Tips : वाढत्या तापमानात 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

निरोगी जीवनशैलीचा अवलंब करत असलात तरी मेंदूशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञ सांगतात. सतत डोकेदुखी होणे, फिट्स येणे, दृष्टी धूसर होणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा बोलण्यात अडचण येणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निरोगी सवयींचे महत्त्व

ब्रेन ट्यूमर पूर्णपणे टाळण्यासाठी निश्चित असा कोणताही उपाय सध्या उपलब्ध नसला तरी निरोगी जीवनशैली मेंदूचे आरोग्य जपण्यास आणि एकूण जीवनमान सुधारण्यास मदत करते. आहार, व्यायाम, झोप आणि ताणतणाव नियंत्रण यांसारख्या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी दीर्घकालीन मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in