'कॉकरोच'चे ९४ टक्के समर्थक भारतीयच - अभिजीत दिपके; 'झुरळां'ना अण्णा हजारेंचा पाठिंबा

सोशल मीडियामार्फत राजकारणात धमाल उडवून देणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोहिमेला समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
'कॉकरोच'चे ९४ टक्के समर्थक भारतीयच - अभिजीत दिपके; 'झुरळां'ना अण्णा हजारेंचा पाठिंबा
'कॉकरोच'चे ९४ टक्के समर्थक भारतीयच - अभिजीत दिपके; 'झुरळां'ना अण्णा हजारेंचा पाठिंबा(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : सोशल मीडियामार्फत राजकारणात धमाल उडवून देणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोहिमेला समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, या पार्टीला ऑनलाइन पाठिंबा दर्शवणाऱ्यांमध्ये बहुसंख्य पाकिस्तानी असल्याचा दावा पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी फेटाळून लावला असून ९४ टक्के समर्थक भारतीय असल्याची आकडेवारी प्रदर्शित केली आहे.

अभिजीत दिपके यांनी शनिवारी एक स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर केले. यामध्ये त्यांनी असा दावा केला की, पक्षाचे अकाऊंट हॅक होण्यापूर्वी ९४ टक्क्यांहून अधिक प्रेक्षक हे भारतातील होते. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी यामध्ये बहुसंख्य समर्थक पाकिस्तानातील असल्याचा दावा करून अशा रीतीने फॉलोअर्स मिळवणाऱ्यांची कीव वाटते असे म्हटले होते. त्याला उत्तर म्हणून दिपके यांची ही पोस्ट आली आहे.

दीपके यांनी स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटची काही आकडेवारी शेअर केली. त्यांनी शेअर केलेल्या डेटानुसार, २२ एप्रिल ते २१ मे या कालावधीत अकाउंटला १६० कोटी व्ह्यूज आणि एक कोटी २० लाख नवीन फॉलोअर्स मिळाले होते.

तसेच, यामध्ये प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांची लोकसंख्याशास्त्रीय माहिती दर्शविली आहे, ज्यानुसार ९४.१ टक्के फॉलोअर्स भारताचे, १ टक्के अमेरिकेचे, ०.७ टक्के ब्रिटनचे, तर कॅनडा व यूएईमधील प्रत्येकी ०.६ टक्के फॉलोअर्स असल्याचे दिसून येते.

'कॉकरोच'चे ९४ टक्के समर्थक भारतीयच - अभिजीत दिपके; 'झुरळां'ना अण्णा हजारेंचा पाठिंबा
'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक

अण्णांचा कॉकरोचला पाठिंबा

दरम्यान, झुरळ हे नाव योग्य नसलं तरी देशातील जनता या पार्टीच्या पाठीशी उभी आहे, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. या दोन्हीचा संगम होतो तेव्हा सरकारने त्याचा अव्हेर न  करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असा सल्लाही अण्णा हजारे यांनी दिला.

राज्यात लोकायुक्त कायद्याला जरी संमती मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय असे उद्गार त्यांनी काढले.

दरम्यान, आण्णा हजारेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. मी लवकरच अण्णा हजारे यांची भेट घेणार आहे, अनेक वर्षांपासून त्यांची माझी भेट नाही, असे महाजन यांनी म्हटले. मात्र, कॉक्रोच जनता पार्टी आणि लोकायुक्त अंमलबजावणीसंदर्भातील वक्तव्यावर स्पष्टपणे उत्तर देणं महाजन यांनी टाळलं आहे. 

'कॉकरोच'चे ९४ टक्के समर्थक भारतीयच - अभिजीत दिपके; 'झुरळां'ना अण्णा हजारेंचा पाठिंबा
एका झुरळाचे महाभारत

दीपके यांची टीका

या पार्टीची वेबसाईट तसेच सोशल मिडिया अकौंट बंद करण्यात आले होते. त्याबाबत दीपके यांनी कडक शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आमचे संकेतस्थळ बंद केले आहे. दहा लाख जणांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यापैकी सहा लाख जणांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरकारला कॉक्रोचची इतकी भीती का वाटते? पण सरकारची हुकूमशाही वृत्ती भारतातील तरुणांचे डोळे उघडत आहे. आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो हाच आमचा एकमेव गुन्हा आहे. पण तुम्ही  इतक्या सहजपणे सुटका करून घेऊ शकत नाही. सध्या आम्ही आमच्या एका नवीन घराच्या उभारणीवर काम करत आहोत. झुरळे कधीच मरत नाहीत, अशी प्रतिक्रिया या कारवाईनंतर संस्थापक अभिजीत दिपके यांनी व्यक्त केली.

दिपकेंच्या घराला संरक्षण

छत्रपती संभाजीनगर: दरम्यान, अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज परिसरातील निवासस्थानी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' हा विषय सध्या ट्रेंडिंगमध्ये असल्याने दिपके यांच्या घराबाहेर गर्दी होऊ नये आणि सुरक्षितता राखली जावी, यासाठी हे चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, ही सुरक्षा कोणत्याही धमकीमुळे दिलेली नसून, त्या भागात कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात धाव

दुसरीकडे, दिल्लीत या उपरोधिक संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. राजा चौधरी या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी केलेल्या तोंडी निरीक्षणांचा गैरवापर करून, त्याचा व्यावसायिक फायदा करून घेतला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेनुसार, न्यायालयात मांडलेल्या मुद्द्यांचा वापर ब्रँडिंग आणि प्रसिद्धीसाठी करणे चुकीचे आहे. या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि बनावट पदव्या वापरून प्रॅक्टिस करणाऱ्या 'बनावट वकिलां'चा शोध घ्यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in