

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वारकरी आणि भाविकांची लगबग सुरू झाली आहे. २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दादर–पंढरपूरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. २४ आणि २६ जुलै रोजी या विशेष फेऱ्या धावणार असून, पुणे मार्गे प्रवास करणाऱ्या भाविकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
२४ जुलैला दादरहून विशेष गाडी
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष रेल्वे २४ जुलै रोजी दुपारी १२.५० वाजता दादर स्थानकातून सुटेल. ही गाडी रात्री ९.१५ वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
२६ जुलैला पंढरपूरहून परतीची फेरी
परतीसाठी गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष रेल्वे २६ जुलै रोजी रात्री १२.१५ वाजता पंढरपूरहून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता दादर स्थानकावर पोहोचणार आहे.
'या' स्थानकांवर थांबा
या विशेष रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील भाविकांनाही या विशेष सेवेचा लाभ घेता येणार आहे.
डब्यांची रचना आणि आरक्षण
या विशेष गाडीत दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3 Tier), दहा शयनयान (Sleeper), चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय आसनांसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाले आहे. यात्रेदरम्यान प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी विशेष रेल्वे चालविण्याचाही विचार करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.