

मुंबई : बारामती विधानसभामतदारसंघाच्या पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग सोपा नाही. बिनविरोध निवडीसाठी महायुतीचे प्रयत्न जोरात चालू आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. खुद्द सुनेत्रा पवार यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे आपण बारामतीत उमेदवार देणारच, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने येत्या २३ एप्रिललापोटनिवडणूक घोषित केली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारी आहे. पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीच्या उमेदवारीसाठी सहा इच्छुकांचे अर्ज आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस उमेदवार देईल, असे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने बारामतीची पोटनिवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, फडणवीस यांनी नागपुरात बोलताना ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशी होईल, असे मत व्यक्त केले. यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राने पोटनिवडणुका बिनविरोध केल्या आहेत. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली होती, ती न लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मन मोठे करून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे फडणवीस म्हणाले.
सुनेत्रांचा फोन
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. मात्र, यावेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि कोणता निर्णय झाला यासंदर्भात उद्धव ठाकरे स्वतः माहिती देतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि अगदी जवळचे सहकारी होते. त्यांचे भावनिक नाते होते. त्यामुळे उद्धव ठाकरेच या पाठिंब्याबाबत निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले. काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मित्र पक्ष म्हणून काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करेल. आघाडी म्हणून एकमेकांशी चर्चा केल्यानंतरच त्यातून निर्णय बाहेर येईल, असे राऊत यांनी सांगितले. परंतु, भाजपसोबत असलेल्या पक्षाला मदत होऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका असू शकते. यासंदर्भात चर्चा करून तोडगा काढू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असून बारामती, राहुरी या दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्व काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. राहुरी मतदारसंघातही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार उद्या अर्ज दाखल करणार
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या, सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार, जय पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित राहणार आहेत. सध्या अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरून वाद सुरू आहे. सुनेत्रा पवार दिल्लीत असताना हे दोन्ही नेते त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.