

सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड, विनयभंग किंवा गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत असतात. अनेकदा अशा प्रकारांमुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, यावेळी अशाच एका घटनेत छेडछाडीचा आरोप असलेल्या तरुणाला सहप्रवाशांनी रेल्वेतच चांगलाच धडा शिकवला. संबंधित महिलेने त्याच्या हातात बांगड्या घातल्या, ओठांवर लिपस्टिक लावत त्याला आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडवली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भुसावळ–वर्धा मेमू प्रवासी रेल्वेमध्ये घडली. शेगाव ते बडनेरा दरम्यान प्रवास करत असताना एका तरुणाने महिला प्रवाशाशी गैरवर्तन करत तिची छेड काढल्याचा आरोप आहे.
महिलेने विरोध करताच प्रवासी धावले मदतीला
सुरुवातीला संबंधित महिलेने तरुणाच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केले. मात्र, गैरवर्तन सुरूच राहिल्यानंतर तिने त्याला जाब विचारत विरोध केला. तिचा आवाज ऐकताच डब्यातील इतर प्रवासी तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी संबंधित तरुणाला रोखून धरले. त्यानंतर संबंधित महिलेने त्याच्या हातात बांगड्या घातल्या आणि ओठांवर लिपस्टिक लावत त्याला चांगलीच अद्दल घडवली. या घटनेदरम्यान डब्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
व्हिडिओ व्हायरल; संमिश्र प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी महिलेने दाखवलेल्या धैर्याचे आणि तिच्या मदतीला धावून आलेल्या सहप्रवाशांचे कौतुक केले आहे.
तर काहींनी महिलेला मिळालेल्या पाठिंब्याचे स्वागत करत, अशा प्रकरणांमध्ये केवळ सार्वजनिक शिक्षा न देता रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) किंवा सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्याकडे तक्रार करून कायदेशीर कारवाई करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतुकीतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, अशा घटनांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.