Chandra Grahan 2026: वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ३ मार्चला; आकाशात 'ब्लड मून'चा देखावा, विदर्भात सर्वाधिक वेळ दर्शन

यंदाचे चंद्रग्रहण ‘चूडामणी योगा’त होत असल्याचे पंचांगकर्त्यांनी नमूद केले आहे. पृथ्वीच्या दाट सावलीत चंद्र गेल्यावर त्याचा रंग काळसर-लालसर दिसतो. यालाच ‘ब्लड मून’ किंवा रक्तचंद्र म्हटले जाते.
वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ३ मार्चला; आकाशात 'ब्लड मून'चा देखावा, विदर्भात सर्वाधिक वेळ दर्शन
वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ३ मार्चला; आकाशात 'ब्लड मून'चा देखावा, विदर्भात सर्वाधिक वेळ दर्शन
Published on

यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी होणार असून महाराष्ट्रात चंद्र उगवत असतानाच ग्रहणाचा शेवटचा टप्पा पाहायला मिळणार आहे. खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक नैसर्गिक आणि सुरक्षित खगोलदृश्य असून ते साध्या डोळ्यांनी पाहण्यास कोणताही धोका नाही.

दुपारी प्रारंभ, पण दिसणार संध्याकाळी

या ग्रहणास दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरुवात होईल. मात्र त्या वेळी चंद्र पूर्व क्षितिजाखाली असल्याने भारतातून ग्रहणाचा प्रारंभ दिसणार नाही. संध्याकाळी चंद्र उगवत असताना ग्रहणाचा शेवटचा भाग विविध शहरांतून काही मिनिटांसाठी पाहता येईल.

‘चूडामणी योग’ आणि ब्लड मून

यंदाचे चंद्रग्रहण ‘चूडामणी योगा’त होत असल्याचे पंचांगकर्त्यांनी नमूद केले आहे. पृथ्वीच्या दाट सावलीत चंद्र गेल्यावर त्याचा रंग काळसर-लालसर दिसतो. यालाच लोकप्रिय भाषेत ‘ब्लड मून’ किंवा रक्तचंद्र म्हटले जाते. त्या रात्री आकाशात गडद लाल छटा दिसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये किती वेळ दिसेल?

ग्रहणाची समाप्ती सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात चंद्रोदयानंतर ते ६:४८ पर्यंतच ग्रहण दिसेल.

मुंबई -चंद्रोदय ६:४५; ग्रहण फक्त सुमारे ३ मिनिटे

पुणे - ६:४१; सुमारे ७ मिनिटे

नाशिक - ६:४०; सुमारे ८ मिनिटे

कोल्हापूर - ६:४०; सुमारे ८ मिनिटे

नागपूर - ६:१८; सुमारे ३० मिनिटे (सर्वाधिक वेळ)

सोलापूर - ६:३३; सुमारे १५ मिनिटे

रत्नागिरी - ६:४४; सुमारे ४ मिनिटे

छत्रपती संभाजीनगर – ६:३४; सुमारे १४ मिनिटे

यावरून दिसते की विदर्भातील भागात ग्रहण अधिक वेळ पाहता येईल, तर कोकण आणि मुंबई परिसरात ते अतिशय कमी वेळासाठीच दृश्य असेल.

वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ३ मार्चला; आकाशात 'ब्लड मून'चा देखावा, विदर्भात सर्वाधिक वेळ दर्शन
Solar Eclipse : तब्बल १०० वर्षांनी होणार दिवसा अंधार! ६ मिनिटांचं महाकाय सूर्यग्रहण जग पाहणार

भीती नव्हे, विज्ञानाची दृष्टी आवश्यक

गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांवर चंद्रग्रहणाबाबत विविध अफवा आणि भीती पसरवली जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, ग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय घटना आहे. शिक्षक आणि पालकांनी मुलांना प्रत्यक्ष हे दृश्य दाखवून त्यामागील विज्ञान समजावून सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

काय लक्षात ठेवावे?

चंद्रग्रहण पाहण्यासाठी विशेष साधनांची आवश्यकता नाही. मात्र क्षितिज स्पष्ट दिसेल अशा मोकळ्या जागेतून निरीक्षण केल्यास दृश्य अधिक स्पष्टपणे पाहता येईल.

३ मार्चच्या संध्याकाळी काही मिनिटांचा हा दुर्मिळ 'रक्तचंद्र' म्हणजेच ब्लड मून अनुभवण्याची संधी खगोलप्रेमींनी दवडू नये.

logo
marathi.freepressjournal.in