

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या साध्या, मनमोकळ्या आणि दिलखुलास स्वभावाच्या आठवणी अनेकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. आपल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी आयुष्यभर माणुसकी जपली. प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनीही आशाताईंशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या आणि त्यांच्या साधेपणाच्या काही खास आठवणींना उजाळा दिला.
प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी २०१९ मध्ये जेव्हा आशा भोसले यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली, तेव्हा त्यांना आशाताईंकडून मिळणाऱ्या भेटीची त्यांना कल्पनाही नव्हती. शस्त्रक्रियेनंतर डॉ. लहाने त्यांच्या घरी गेले त्यावेळी, आशा ताईंनी त्यांच्या सहकारी डॉ. रागिणी पारेख यांना एक सुंदर साडी भेट दिली. यावेळी "शस्त्रक्रिया मी केली," असे डॉ. लहाने यांनी हसत सांगताच, आशाताईंनी "तुमच्यासाठीही साडी आणते," असे मिश्किलपणे उत्तर दिले होते. अशा शब्दांत डॉ. लहाने यांनी आशाताईंच्या साधेपणाची आठवण सांगितली.
त्या मला प्रेमाने तात्या म्हणायच्या...
पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. लहाने यांचे आशा भोसले यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे नाते होते. "आशाताई मला प्रेमाने 'तात्या' अशी हाक मारत असत. त्यांना कशाचीही गरज भासली की त्या स्वतः मला फोन करत", अशी आठवण डॉ. लहाने यांनी सांगितली.
त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हे सुवर्णक्षण
रुग्णालयात येताना त्या सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत, विनोद करत आणि कधी कधी एखादे गाणेही गुणगुणत असत. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हे सुवर्णक्षण होते, अशा भावना डॉ. लहाने यांनी व्यक्त केल्या. तसेच, डॉ. लहाने जेव्हा आशाताईंच्या घरी जात असत, तेव्हा त्या स्वतः त्यांना पोहे वाढून खाऊ घालत असत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
गायन हा माझा श्वास आहे!
आशा भोसले यांनी आपल्या ९० व्या वाढदिवसानिमित्त संगीताबद्दलच्या भावना व्यक्त करताना, "जसा श्वास थांबला की माणूस मरतो, तसेच संगीत माझा श्वास आहे. मी आयुष्यभर याच विचाराने जगले," असे म्हटले होते. 'दम मारो दम'सारखी अनेक दशकांपूर्वीची गाणी आजही तितकीच लोकप्रिय असल्याचे श्रेय त्या उत्कृष्ट लेखन, संगीत आणि गायनाला देत. मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश यांसारख्या दिग्गज गायकांसोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी सादर केली. संगीत ही कधीही न संपणारी नदी आहे, असे मानणाऱ्या आशाताईंनी शेवटपर्यंत स्वतःला काळानुसार विकसित ठेवले.