

गडचिरोली जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. कोरची तालुक्यात एका आठ वर्षांच्या अनाथ चिमुकलीवर तिच्याच नात्यातील २२ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. होळीच्या सणाच्या दिवशी घडलेली ही घटना तब्बल पाच दिवसांनी उघडकीस आली असून परिसरात संताप व्यक्त होत आहे.
होळीच्या दिवशी फूस लावून घरात नेले अन्...
पीडित मुलगी अनाथ असून सध्या ती आपल्या मामा-मामीकडे राहत आहे. होळीच्या दिवशी गावात सणाचा उत्साह सुरू असताना, आरोपीने मुलीला फूस लावून आपल्या घरी नेले. नात्यातीलच असलेल्या २२ वर्षीय तरुणाने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला.
घडलेली घटना कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने मुलीला गप्प बसण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे.
पाच दिवसांनी उघड झाला प्रकार
आरोपीच्या भीतीमुळे पीडित मुलगी काही दिवस गप्प राहिली. मात्र काही दिवसांनी मामी तिला आंघोळ घालत असताना तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि पोटावर सूज दिसून आली. त्यामुळे संशय आल्याने मामीने तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा त्या चिमुरडीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनाथ मुलीवर झालेल्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.