

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी पुढे आली आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे राज्यात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून आगामी ३० जूनपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा 'दिलासा' पोहोचण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असल्यामुळे निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू आहे. राज्य सरकारने यापूर्वीच पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे, बँकांकडून थकीत कर्जाचा तपशील मागवणे आणि आर्थिक तरतूद करण्याचे काम सुरू केले होते. मात्र आचारसंहितेमुळे या संपूर्ण प्रक्रियेवर पाणी फेरले जाण्याची भीती व्यक्त होत होती.