

विजय पाठक / जळगाव
जळगाव महापालिकेत इतिहास घडला आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने ७५ पैकी ६९ जागा सहज जिंकल्या. या अभूतपूर्व यशाचे श्रेय गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला दिले जात आहे, तसेच जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी घेतलेल्या मेहनतीलाही मान दिला जातो. बहुमताची घोषणा होताच भाजप कार्यलयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
जळगाव शहरात ५३.५९ टक्के मतदान झाले. महापालिका सार्वत्रिक मतदानाची मोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. सुरुवातीला पोस्टल बॅलेट, त्यानंतर १० वाजता मशीनमधील मतदान मोजण्यात आले. निवडणुकीपूर्वी भाजपचे सहा आणि शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मतमोजणी सुरू होताच प्रभाग क्रमांक १ मध्ये पहिले तीन भाजप विजयी ठरले, तर चौथा अपक्ष ठरला. यानंतर भाजपचा विजयाचा रथ अखंड दौडत राहिला. गिरीश महाजन यांनी निवडणुकीपूर्वी इतर पक्षातील मातब्बर नेत्यांना भाजपात घेतले होते आणि त्यांना तिकीटे दिली होती; ते सर्व उमेदवारही निवडून आले.
भाजपने महायुतीत ४७ जागांवर लढवली आणि त्यापैकी ४६ जागा जिंकल्या. शिवसेना (शिंदे गट) ने २३ जागा लढवली, त्यापैकी २२ जागा जिंकल्या. उबाठ पक्षाला ५ जागा तर अपक्षाला १ जागा मिळाली.
येत्या काही ऐतिहासिक क्षणांमध्ये माजी महापौर नितीन लढढा निवडून आला, तर जेलमधून निवडणूक लढवलेले माजी महापौर ललित कोल्हे यांनाही विजय मिळाला. माजी महापौर जयश्री महाजनही निवडून आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रफुल्ल देवकरही अटीतटीच्या लढतीत विजयी झाले.
या अभूतपूर्व विजयाचे साजरे करण्यासाठी २० टन गुलाल मागवण्यात आले होते. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी आ. सुरेश भोळेही सहभागी झाले होते.