

सुमित घरत /भिवंडी
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने ३० तर राष्ट्रवादी (शप) ने १२ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील राहणार आहेत.
विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढले होते. मात्र, निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणी समाजवादीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी काँग्रेसला साथ दिली, ज्यामुळे पूर्वेत काँग्रेसचे जवळपास २४ उमेदवार निवडून आले. भिवंडी पूर्व मध्ये समाजवादी पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात होती; मात्र समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी व आमदार रईस शेख यांच्यातील अंतर्गत वाद उफाळल्याने शेख यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. यामुळे समाजवादीला फटका बसला असून, त्यांना अवघ्या ६ जागा जिंकता आल्या, त्यातील सर्व जागा भिवंडी पश्चिमेत असून पूर्वेत समाजवादीला एकही जागा मिळाली नाही.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या १२ उमेदवारांना देखील रईस शेख यांनी छुपा पाठिंबा दिला, त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.
पालिकेवर सत्ता स्थापनेसाठी दावा करणाऱ्या भाजप-शिंदेसेनेच्या युतीला फक्त ३४ जागांवर विजय मिळाला. भाजपच्या एकूण २२ उमेदवारांपैकी ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर शिंदेसेनेला १२ जागांवर विजय मिळाला.
कोणार्क विकास आघाडीचे चारही उमेदवार प्रभाग १ मधून निवडून आले असून त्यांनी भाजपच्या चारही उमेदवारांचा पराभव केला. यामध्ये भाजप आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले यांचा पराभव देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे कोणार्कने आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध केले.
माजी महापौर जावेद दळवी यांच्या भिवंडी विकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळविला आहे. तर प्रभाग २२ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शाम अग्रवाल यांचा अपक्ष उमेदवार नितेश एनकर यांनी २१ मतांनी पराभव करत येथे अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का
भिवंडी महापालिका निवडणुकीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. प्रभाग १ मध्ये भाजप आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र कोणार्क विकास आघाडीचे मयुरेश पाटील यांनी मित चौघुले यांना १६९७ मतांनी पराभव केला. प्रभाग २२ मधील भाजपचे माजी नगरसेवक व गट नेते शाम अग्रवाल यांचा अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर यांनी २१ मतांनी पराभव केला.प्रभाग ९ मधील शिंदेसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांचा भाऊ व माजी नगरसेवक संजय म्हात्रे यांचा काँग्रेस उमेदवार तारिक अब्दुल बारी मोमीन यांनी ५२३१ मतांनी पराभव केला.प्रभाग ३ ड मध्ये आरपीआय (एकतावादी) चे प्रस्थापित नेते विकास निकम यांना काँग्रेसचे रोहिदास रंगनाथ वाघमारे यांनी ९२५ मतांनी पराभव केला. या प्रभागात विकास निकम यांना एकूण ४४२८ तर वाघमारे यांना ५३५३ मतांची मिळकत झाली. प्रभाग ४ मधील समाजवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अरुण राऊत यांचा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या मेहबूब अब्दुल रशीद शेख यांनी ३५२८ मतांनी पराभव केला.
एकूण ९० जागेतील पक्षीय बलबळ
काँग्रेस – ३०
राष्ट्रवादी (शरद पवार) – १२
भाजप – २२
शिंदेसेना – १२
समाजवादी – ६
कोणार्क विकास आघाडी – ४
भिवंडी विकास आघाडी – ३
अपक्ष – १