साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार

साखरपुड्यासाठी गुजरातहून निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. जळगावातील कार, एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण तिहेरी अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांसह दुचाकीस्वारचाही मृत्यू झाला.
साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार
साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार
Published on

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात मंगळवारी (दि. ९) सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात गुजरातमधील एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांचा मृत्यू झाला. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अमळनेरकडे निघालेल्या कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील व्यारा येथील एक कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अमळनेरकडे येत होते. मंगरूळ गावाजवळ अमळनेर-धुळे महामार्गावर त्यांच्या कारचा एसटी बस आणि दुचाकीशी भीषण अपघात झाला.

भरधाव कारचे नियंत्रण सुटले

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धुळ्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या भरधाव कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कारने समोरून येणाऱ्या एसटी बस आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला, तर कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील पाचही प्रवाशांचा आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

ग्रामस्थांनी केली मदत

अपघाताचा मोठा आवाज ऐकून मंगरूळ गावातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. आपत्कालीन यंत्रणा पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर कारमध्ये काही जण अडकून पडले होते. ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढले.

साखरपुड्याच्या आनंदावर विरजण! जळगावात कार-एसटी-दुचाकीचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा अंत, दुचाकीस्वारही ठार
Dadar BEST Bus Accident : घरात लग्नाची तयारी, बहिणीच्या संसाराचीही स्वप्नं; पण क्षणात सर्व संपलं, २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

एसटीतील प्रवासी जखमी

या अपघातात एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही अन्य प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनांचा वेग, रस्त्याची स्थिती आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in