जळगावमध्ये २०१२ पासून जलकुंभांची सफाईच नाही; नागरिकांच्या नशिबी पिवळसर पाणी

शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या जलकुंभांची तब्बल २०१२ पासून सफाईच झालेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जळगावमध्ये २०१२ पासून जलकुंभांची सफाईच नाही; नागरिकांच्या नशिबी पिवळसर पाणी
जळगावमध्ये २०१२ पासून जलकुंभांची सफाईच नाही; नागरिकांच्या नशिबी पिवळसर पाणीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

जळगाव : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या जलकुंभांची तब्बल २०१२ पासून सफाईच झालेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे जळगावकरांना दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाणी पिण्याची वेळ आली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

महापालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित करताच महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने जलकुंभांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महासभेत पाणीपुरवठ्याचा बोजवारा, नव्याने बांधलेल्या निकृष्ट रस्त्यांची अवस्था तसेच प्रशासनातील वाढती मक्तेदारी यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

शहरात २५७ कोटी रुपये खर्च करून अमृत योजना राबविण्यात आली असतानाही नागरिकांना दूषित, दुर्गंधीयुक्त व कमी दाबाने पाणी मिळत असल्याची जोरदार तक्रार सभागृहात करण्यात आली. नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी इतका मोठा खर्च करूनही अनेक भागांना पुरेसे पाणी मिळत नसेल, तर या योजनेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला. शहरातील जलवाहिन्यांची दुरवस्था व मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गळतीकडेही त्यांनी लक्ष वेधले.

नगरसेवक नितीन बरडे यांनी शहरातील जलकुंभांची २०१२ पासून सफाईच झालेली नसल्याचा मुद्दा मांडला. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक सदस्यांनी व्यक्त केली. यावर महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व जलकुंभ स्वच्छ करण्याचे आदेश दिले.

जळगावमध्ये २०१२ पासून जलकुंभांची सफाईच नाही; नागरिकांच्या नशिबी पिवळसर पाणी
उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी सात दिवसांच्या आत पाईपलाईनमधील गळती शोधून ती दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. ॲड. सुविता हाडा यांनी रात्री २ वाजता पाणीपुरवठा होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले.

दरम्यान, मलिक नगर परिसरात तीन महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याची माहिती नगरसेवक अक्षय वंजारी यांनी दिली. यावर महापौरांनी संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले.

आयुक्तांनी पाहणी करावी

शहरातील वाढते अतिक्रमण व प्रशासनाची निष्क्रियता यावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरसेवक अमर जैन यांनी अतिक्रमण कारवाईत भेदभाव होत असल्याचा आरोप करत, गरीबांच्या टपऱ्यांवर कारवाई केली जाते; मात्र मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होते, अशी टीका केली. आयुक्तांनी स्वतः या प्रकरणाची पाहणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in