

मुंबई : राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसत आहेत. अकोल्यात शनिवारी या मोसमातील सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तापमान ४६अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उष्माघाताने तरुणाचा मृत्यू
परभणीत ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तापमानाचा वाढता पारा
गेल्या काही दिवसांत अकोल्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक ठरत आहे. तर जळगाव शहरात तापमान ४३ अंशांच्या पुढे गेल्याने महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
विजेच्या मागणीत विक्रमी वाढ
दरम्यान, येत्या काही दिवसांत दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशातील वीज मागणीचा उच्चांक नोंदवला गेलाय. एप्रिल महिन्यात विजेच्या मागणीने २४० गिगावॉटचा टप्पा गाठला. गेल्या वर्षी जून महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी २४२.७७ गिगावॉट इतकी नोंदवली गेली. वाढती उष्णता आणि एप्रिल महिन्यापासूनच सुरू झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामातली आतापर्यंतही ही सर्वोच्च पातळी आहे. कमाल तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअसच्यादरम्यान असल्याने आणि उष्णतेच्या लाटांचा प्रभाव असल्यामुळे एसी, कुलर्स आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी क्षेत्रात पंप संचांचा वापर वाढल्यामुळेही विजेचा खप वाढला आहे. उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी अंदाजे २७० गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज विद्युत विभागाने वर्तवला आहे.
नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे, तसेच पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही म्हटले आहे. तसेच हलके सुती कपडे वापरावेत, लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.पावसाळ्यापर्यंत पुढील काही दिवस पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे.
मुंबईतही वाढला उन्हाचा तडाखा
मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. एप्रिल महिन्यातच मुंबईचा पारा ३९ अंश सेल्सिअस वर पोहचला आहे. हवामान विभागाकडून खरंतर रविवारी आणि सोमवारी शहरात आणि मुंबईच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत पारा ३९ अंश सेल्सियस वर पोहोचला आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी घरी राहणेच पसंत केले आहे.