

देवश्री भुजबळ / मुंबई :
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि मेघगर्जनेसह हवामानातील बदलांमुळे शुक्रवारी तापमान सामान्यापेक्षा कमी नोंदवले गेले.
सांताक्रूझ हवामान केंद्राने दिवसभरातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवले, जे सामान्यापेक्षा ४.७ अंशांनी कमी होते. तर कुलाबा वेधशाळेने ३१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले, जे सामान्यापेक्षा ३.३ अंशांनी कमी आहे. तथापि, आर्द्रतेचा स्तर ९० टक्क्यांच्या आसपास कायम राहिला.
चक्री वादळासदृश स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून यलो अलर्ट जारी आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या महानगरीय भागात हलक्या ते मध्यम पावसासह वादळी वारे वाहत आहेत.
शुक्रवारी संध्याकाळीही हवामान खात्याने 'अलर्ट' जारी केला. ज्यात काही भागांत ४० ते ५० आहे. किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.
स्थानिक हवामान अंदाजानुसार येते २४ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग अधूनमधून ४० ते ५० किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला