

मुंबई : विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारचा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींनी गाजला. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघात आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आघाडीवर मतदानाच्या आधीच सहा जागा गमावण्याची नामुष्की ओढवली. अहिल्यानगरबाबत रात्री उशिरापर्यंत घोळ चालू राहिला. मात्र अखेरीला प्राजक्त तनपुरे बिनविरोध येणार हे स्पष्ट झाले.
सातपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर निवडणूक रिंगणातून माघार घेण्याच्या उमेदवारांच्या निर्णयाची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कोकणातील उमेदवार बाळ माने आणि संभाजीनगरच्या देवयानी डोणगावकर आणि कृष्णा डोणगावकर यांची हकालपट्टी केली आहे.
मंत्री नितेश राणे हे थेट ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण विधान परिषदेचे उमेदवार बाळ माने यांना सोबत घेऊन अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले, तर नाशिकमध्ये गोकुळ गीते हे अर्ज माघारीवरून चर्चेत राहिले, तर गणेश गीते यांनी सकाळीच अर्ज मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.
कोकणात अनिकेत तटकरे बिनविरोध
रायगडमध्ये महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बाळ माने हे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शेकापच्या अरविंद म्हात्रे यांच्याकडून अर्ज मागे घेण्यात आला.
महायुतीच्या जागावाटपात रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या जागेवर बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, पक्षविरोधी कृत्यामुळे बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले. या मतदारसंघात अनिकेत तटकरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी गुरूवारी माघार घेतली. तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्याने विक्रम काकडे यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग सुकर झाला.
अहिल्यानगरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर करण ससाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतली. प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाकी होता. शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरेंचा अर्ज मागे घेतल्याचे समोर आले. तर दत्तात्रय पानसरे यांनी अर्ज मागे घेतला नसल्याचे म्हटले आहे.
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिजीत पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी माघार घेतल्याने रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले.
नाशिक स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला. हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असून तिथे नरेंद्र दराडे हे उमेदवार आहेत. त्यामुळे या ठिकाणी नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होईल.
यवतमाळ स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या साहेबराव कांबळे यांनी बुधवारी माघार घेतली. त्यामुळे मविआकडून सय्यद फारूख यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र, सय्यद फारुख यांनीही अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झाले.
जळगाव विधान परिषदेसाठी आतापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार आसिफ मोहम्मद, सुनील जंगले, प्रवीण पाटील या उमेदवारांनी माघार घेतली असून तसेच अपक्ष उमेदवार कलीम मणियार, उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख निलेश चौधरी यांनी माघार घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार दीपक धांडे यांनी माघार घेतली आहे. शिंदेंच्या सेनेच्या रेश्मा काळे यांनी माघार घेतलेली नाही. भाजपकडून नंदकिशोर महाजन आणि ठाकरेंच्या सेनेकडून शरद तायडे रिंगणात आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे आमने-सामने आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिलेली, त्या देवयानी डोणगावकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या मतदारसंघातून समीर सत्तार यांनी देखील माघार घेतली.
नागपूरमध्ये काँग्रेसचे दुसरे क्रमांकावर असलेले उमेदवार दिनेश ढोले, शेकापचे अपक्ष उमेदवार सुरेंद्र लोही, राजेंद्र जंगले यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या ठिकाणी अतुल लोंढे यांच्या विरोधात महायुतीचे डॉ. राजीव पोतदार असतील.
महायुतीला नांदेडमध्ये देखील बंड शमवण्यात यश आले. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी माघार घेतली. या ठिकाणी काँग्रेसचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर.
धाराशिव-लातूर-बीड : महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख निवडणूक आखाड्यात आहेत. धाराशिव लातूर बीड विधान परिषदेतील सर्व सात अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
११ मतदारसंघांतील प्रमुख लढती
१. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार).
२. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर).
३. सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष).
४. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस).
५. भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप).
६. नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना).
७. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित).
८. धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस).
९. परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष).
१०. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना).
११. नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
बिनविरोध विजयी उमेदवार
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी ( भाजप)
पुणे : विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)