"उद्घाटनाला येणार नाही, कारण मला लाज वाटते"; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर नितीन गडकरींची नाराजी

Mumbai-Goa Highway : "मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक कंत्राटदार अपयशी ठरले आहेत. जगात अनेक रेकॉर्ड्स झाले आहेत. आता मलाही...
"उद्घाटनाला येणार नाही, कारण मला लाज वाटते"; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर नितीन गडकरींची नाराजी
"उद्घाटनाला येणार नाही, कारण मला लाज वाटते"; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर नितीन गडकरींची नाराजी(Photo-X)
Published on

पणजी : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला झालेल्या विलंबावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "या कामाला इतका विलंब झाला की मला लाज वाटतेय," अशी खंत व्यक्त करत गडकरी यांनी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (Black List) टाकण्यासह जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा दिला. ऑक्टोबरमध्ये मुंबईहून रस्त्याने गोव्याला प्रवास करत महामार्गाच्या कामाची स्वतः पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील दिरंगाई आणि निकृष्ट कामाविरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'मुंबई-गोवा महामार्गाला उशीर झाला, ही दुर्भाग्याची गोष्ट'

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "मुंबईतून गोव्यात येण्याकरता मुंबई-गोवा महामार्गात कोकणाचाही भाग आहे. माझ्या दृष्टीने ही थोडी दुर्भाग्याची गोष्ट आहे. पण मुंबई-गोवा महामार्ग व्हायला बराच उशीर झाला. एखादी चूक झाली तर मान्य करायला हवी, त्याला केवळ मी जबाबदार नाही.”

महामार्गाच्या कामात अनेक कंत्राटदार अपयशी ठरल्याचेही त्यांनी सांगितले. याच संदर्भात गडकरी यांनी कठोर कारवाईचा इशारा देताना म्हटले, "मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक कंत्राटदार अपयशी ठरले आहेत. जगात सात रेकॉर्ड्स झाले आहेत. आता मलाही रेकॉर्ड करायचा आहे की, वर्षभरात जास्तीत कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टेड करायचं आहे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करायचं आहे."

पर्वरी येथे सहा पदरी उड्डाणपूल मार्गिकेच्या उद्घाटनानंतर गडकरी बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ऑक्टोबरमध्ये स्वतः महामार्गाची पाहणी

महामार्गाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. "मी ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावर उतरेन आणि तेथून रस्त्याने गोव्याला जाईन. महामार्गाची स्वतः पाहणी करून प्रवाशांसाठी प्रवास किती सोयीस्कर झाला आहे, हे तपासेन," असे त्यांनी स्पष्ट केले.

महामार्ग 'ग्रीन हायवे' करण्याची सूचना

मुंबई-गोवा महामार्गालगत गोव्याची वास्तुकला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकला परंपरा दर्शविणाऱ्या सुविधा विकसित करण्याचे आवाहन गडकरी यांनी गोवा सरकारला केले. पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थ तसेच हातमाग आणि हस्तकला उत्पादने अनुभवता व खरेदी करता यावीत, यासाठी महामार्गालगत योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.

महामार्गाचे 'ग्रीन हायवे'मध्ये रूपांतर करण्यावरही त्यांनी भर दिला. रस्त्यालगत वृक्षलागवड करताना कोणत्या प्रजाती पर्यावरणासाठी अधिक उपयुक्त आहेत, याचा शास्त्रीय अभ्यास करून नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हा महामार्ग 'ऑक्सिजन पार्क'च्या धर्तीवर विकसित करता येईल, अशी सूचनाही त्यांनी केली.

पर्यायी इंधनासाठी सुविधांचा प्रस्ताव

महामार्गावरील पेट्रोल-डिझेल पंपांसोबत जैवइंधन, इलेक्ट्रिक वाहने आणि इतर पर्यायी इंधनांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गडकरी यांनी मांडला. इलेक्ट्रिक, हायड्रोजन आणि फ्लेक्स-फ्युएलसारख्या पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

"उद्घाटनाला येणार नाही, कारण मला लाज वाटते"; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर नितीन गडकरींची नाराजी
'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा

गोव्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाजारपेठांचे नियोजन, शहराबाहेर गोदामे हलवणे, बस डेपोचे आधुनिकीकरण आणि वाहतुकीच्या हालचालींमध्ये समन्वय साधण्यासारख्या उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या. तसेच कचरा समुद्रात जाणार नाही आणि जल, वायू व ध्वनी प्रदूषण कमी होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पर्वरीच्या उड्डाणपुलाची क्षमता वाढली

पर्वरी येथील नव्या उड्डाणपूल मार्गिकेचा उल्लेख करताना गडकरी यांनी सांगितले की, मूळतः दोन पदरी क्षमता असलेल्या या मार्गावर आता प्रत्यक्षात दहा पदरी वाहतुकीची क्षमता निर्माण झाली आहे. जमिनीच्या पातळीवर चार पदरी आणि उड्डाणपुलावर सहा पदरी मार्गिका उपलब्ध झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in