ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून आज (दि. २७) सकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान विभागानुसार (IMD), मुंबई आणि कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता आहे, तसेच ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच महाराष्ट्रातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून आज (दि. २७) सकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान विभागानुसार (IMD), मुंबई आणि कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता आहे, तसेच ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच महाराष्ट्रातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात कडाक्याची थंडी होती. मात्र आता थंडीचा कडाका कमी होत असून, त्यानंतरच राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे.

मुंबईसह रायगड जिल्ह्यातही सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. यामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, IMD ने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये नंदूरबार, धुळे, जळगाव (उत्तर महाराष्ट्र) तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी (मराठवाडा) जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

IMD च्या अंदाजानुसार, २७ जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होईल, मात्र त्याचवेळी दिवसा तापमानात वाढ होऊन उष्ण हवामान जाणवण्याची शक्यता आहे.

कोकण आणि मुंबईतील हवामान स्थिती

IMD नुसार, कोकण आणि मुंबई परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई-ठाणे परिसरात आज सकाळी हलक्या धुक्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. दुपारनंतर वातावरण अंशतः ढगाळ राहणार असून, किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.

मुंबईत आज कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

इतर भागांतील हवामान

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून दुपारनंतर उष्णता जाणवू शकते. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी २७ आणि २८ जानेवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागांतही अंशतः ढगाळ हवामान राहील, असे IMD ने सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in