

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपीला नाशिक क्राइम ब्रँच युनिट २ने ताब्यात घेतले आहे. राजस्थानचे तपास पथक आल्यानंतर संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राजस्थान पोलिसांनी देशभरातून १६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिसांनी बीएमएसच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या ३० वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीला नाशिक पोलीस राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. संशयित मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवाशी आहे. सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एकाला ताब्यात घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार कारवाई करून ताब्यात घेण्यात आले आहे. तांत्रिक तपास करून फोटोवरून संशयित आरोपीला एक तासात नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित हा वेषांतर करून टक्कल करून फिरत होता. मंदिरात दर्शनाला जात असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संशयित आरोपीने, ज्याची स्वतःची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी आहे, दहा लाख रुपये मोजून प्रश्नपत्रिका मिळवली. त्यानंतर नफ्याची संधी साधत त्याने हीच प्रश्नपत्रिका पंधरा लाख रुपयांना विकली. हा व्यवहार झाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखी पसरली, ज्यामुळे परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे संपुष्टात आली.
नीट पेपरची पहिली लीक कॉपी नाशिकमध्ये उपलब्ध झाली. येथून ही प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, जिथे त्याचे दहा वेगवेगळे सेट तयार करण्यात आले. त्यानंतर हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी विस्तारली गेली. जयपूरमधील मनीष नावाचा तरुण या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. सीबीआय आता या प्रकरणातील तेरा संशयितांची सखोल चौकशी करत असून यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.