

नागपूर : फाळणीनंतर जे लोक पाकिस्तानातून भारतात आले, ते ‘निर्वासित’ (रिफ्युजी) नव्हते, तर ते मातृभूमी आणि धर्मावरील प्रेमापोटी प्रचंड हालअपेष्टा आणि वेदना सहन करणारे ‘संघर्षरत योद्धे’ होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात पिढ्यानपिढ्या कमावलेली संपत्ती, जमीन आणि व्यवसाय मागे सोडून या लोकांनी भारताची निवड केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नागपूर येथे सिंधी समाजाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘सिंधू एज्युकेशन सोसायटी’च्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवारी ते बोलत होते. सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, असे टप्पे संस्थेने केलेल्या कामाचा आढावा घेण्याची आणि आपल्या ध्येयांचे स्मरण करण्याची संधी देतात.
सरसंघचालक म्हणाले की, फाळणीनंतर लोकांनी जाणीवपूर्वक भारतात येण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना ‘भारत’ असलेल्या भूमीत राहायचे होते, जेथे ते कोणत्याही भीतीशिवाय आपल्या धर्माचे पालन करू शकतील. ते निर्वासित नव्हते. जरी ते विस्थापित झाले असले, तरी त्यावेळी त्यांच्यासाठी वापरला गेलेला हा शब्द चुकीचा होता.
मूल्याधारित शिक्षणाची गरज!
शिक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले की, रोजगारासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे असले तरी तेच अंतिम ध्येय असू नये. काय योग्य आणि काय अयोग्य यातील फरक समजण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. असे शिक्षण केवळ पुस्तकांतून मिळत नाही, तर शिक्षकांचे वर्तन आणि ते विद्यार्थ्यांवर जे संस्कार करतात त्यातून मिळते. चांगला माणूस आणि समाजाच्या कल्याणासाठी जागरूक असणारी पिढी निर्माण करणे, हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हताश होऊ नका!
प्रतिकूल परिस्थितीसमोर कधीही हार मानू नये, तर पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणीही परिस्थिती किंवा नशिबासमोर हताश होऊ नये. जो माणूस (कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी) प्रयत्न करतो तोच शेवटी यशस्वी होतो, असे भागवत यांनी सांगितले.