पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चांना वेग आला असतानाच, सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि.२३) महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. यासोबतच, त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केले.
सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, "पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. तसेच शरद पवार गटाकडूनही कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही."
ठाकरे बंधूंच्या युतीचा उल्लेख
"ठाकरे बंधू एकत्र येतायेत ही आनंदाची गोष्ट. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना ही सर्वात मोठी आदरांजली असेल," असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी याआधी पुण्यात झालेल्या बैठकीनंतर युतीबाबत महत्त्वाचा दावा केला होता. काकडे म्हणाले होते की, “आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात बैठक झाली. दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी तीन नेत्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. सविस्तर चर्चा झाली असून पुणे महापालिका निवडणूक संयुक्तपणे लढण्याचा तत्त्वतः निर्णय झाला आहे. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमच्या इतर सहकाऱ्यांशी चर्चा करू.”
काकडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले, “अजित पवार गटाकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही त्यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. महाविकास आघाडीची युतीविषयक बैठक झाली आहे. कोणालाही आघाडीत सामावून घ्यायचे की नाही, हा निर्णय सर्व घटकांशी चर्चा करूनच घेतला जाईल.”
राजीनाम्याचं मला माहिती नाही
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांवरही सुळे यांनी खुलासा केला. “राजीनाम्याचं मला माहिती नाही. कारण माझ्याकडे राजीनामा आला नाही. शिंदेंकडून मला कळवण्यात आलं नाही. मला किंवा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना प्रशांत जगताप यांचा कोणताही राजीनामा प्राप्त झालेला नाही,” असे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या हिताला प्राधान्य
युतीबाबत अंतिम निर्णय घेताना पक्ष कार्यकर्ते, पुणेकर जनता आणि शहराचा विकास या बाबी डोळ्यांसमोर ठेवल्या जातील, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांची मुंबईत स्वतंत्र बैठक सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “आमचा प्रयत्न असेल की उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) हे सर्व एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवतील,” असे सुळे म्हणाल्या.