

पुणे : गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार असून, अवजड वाहनांना तब्बल ४८ तास पुणे शहरात प्रवेशबंदी राहणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुका पुढे जातील त्यानुसार शहरातील १७ प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकांसाठी पर्यायी रिंग रोड मार्ग निश्चित करण्यात आला असून, मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विविध ठिकाणी वाहतूक वळवण्यात येणार आहे.
शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी पहाटेपासून वाहतूक निर्बंधांना सुरुवात होईल. गणेश विसर्जन मिरवणुका शहराच्या मध्यवर्ती भागातून पुढे सरकत जातील, त्यानुसार संबंधित रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातील. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पहिल्या मानाच्या श्री कसबा गणपतीची पूजा झाल्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोड या चार प्रमुख मार्गांवरून मिरवणूक पुढे जाईल आणि हे मार्ग अलका टॉकीज चौकात एकत्र येतील.
१७ प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद
२५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून पहिल्या वाहतूक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होईल. संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यानचा लक्ष्मी रोड बंद करण्यात येईल. सकाळी ९ वाजल्यापासून काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौकादरम्यानचा शिवाजी रोड आणि जेधे चौक ते टिळक चौकादरम्यानचा टिळक रोड वाहतुकीसाठी बंद राहतील. याच वेळेत सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौकादरम्यानचा बागडे रोड आणि देवजीबाबा चौक ते हमजेखान चौकादरम्यानचा गुरू नानक रोडही बंद करण्यात येईल.
सकाळी १० वाजल्यापासून सावरकर चौक ते फुटका बुरुज चौकादरम्यानचा बाजीराव रोड, टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौकादरम्यानचा कुमठेकर रोड, दारूवाला ब्रिज ते जिजामाता चौकादरम्यानचा गणेश रोड, बुधवार चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यानचा केळकर रोड आणि सेनादत्त चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यानचा शास्त्री रोड बंद करण्यात येईल.
सकाळी ११ वाजल्यापासून झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौकादरम्यानचा जंगली महाराज रोड आणि खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारादरम्यानचा फर्ग्युसन कॉलेज रोड बंद राहील.
दुपारी १२ वाजल्यापासून पीवायसी जिमखाना ते गुडलक चौकादरम्यानचा भांडारकर रोड, व्होल्गा चौक ते जेधे चौकादरम्यानचा पुणे-सातारा रोड, सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौकादरम्यानचा सोलापूर रोड आणि डेक्कन पोस्ट ते भेलारे मामा चौकादरम्यानचा प्रभात रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल.
मिरवणुका संबंधित मार्गावरून पुढे जाईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. मिरवणुकीची स्थिती आणि त्या वेळची वाहतूक परिस्थिती पाहून निर्बंधांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील.
वाहनचालकांना पर्यायी रिंग रोडचा पर्याय
शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पर्यायी रिंग रोड मार्ग निश्चित केला आहे. मिरवणुकीच्या मार्गावर प्रवेश न करता वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या पर्यायी व्यवस्थेत कर्वे रोड, नळ स्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, विद्यापीठ परिसर, सातारा रोड, व्होल्गा चौक तसेच विविध जोडरस्त्यांचा समावेश आहे. मिरवणुकीनुसार वाहतूक वळवण्यासाठी जंगली महाराज रोडवरील झाशी राणी चौक, शिवाजी रोडवरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रोडवरील अपोलो टॉकीज आणि दारूवाला ब्रिज, लक्ष्मी रोडवरील संत कबीर पोलिस चौकी, सोलापूर रोडवरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रोडवरील व्होल्गा चौक, बाजीराव रोडवरील सावरकर चौक, लाल बहादूर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रोडवरील नळ स्टॉप आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवरील गुडलक चौक ही प्रमुख ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
४८ तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी
२५ सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुणे शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढू नये आणि मिरवणुका तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय मिरवणूक मार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंगचे निर्बंधही लागू करण्यात येणार आहेत. जंगली महाराज रोड, शिवाजी रोड, मुदलियार रोड, लक्ष्मी रोड, सोलापूर रोड, सातारा रोड, बाजीराव रोड, लाल बहादूर शास्त्री रोड, कर्वे रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोड या परिसरात वाहन पार्क करण्यास निर्बंध असतील.
वाहतूक नियोजनासाठी AI ची मदत
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडीची ठिकाणे आधीच ओळखण्यासाठी आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यासाठी यंदा कृत्रिम बुद्धिमत्तेचीही मदत घेतली जात आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून AI आधारित 'ट्रॅफिक्युअर' प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे.
उत्सवाच्या सुरुवातीपासून वाहतुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, संभाव्य कोंडीचा अंदाज घेणे आणि प्रत्यक्ष वेळेतील परिस्थितीनुसार पोलिस कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती करण्यासाठी या प्रणालीची मदत घेतली जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते शहराच्या मध्यवर्ती भागात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
२६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी पोलिसांनी २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी केवळ निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यांवर किंवा त्यालगत वाहने पार्क करू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
धायरी, मुंढवा, हडपसर परिसरातही बदल
मुख्य विसर्जन मिरवणुकीबरोबरच धायरी फाटा, केशव नगर-मुंढवा आणि ससाणे नगर-हडपसर परिसरासाठीही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. ससाणे नगर-हडपसर भागात काळेपडळ अंडरपास, मुंढवा आणि ससाणे नगर-मांजरी रोड परिसरात वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.