

पुणे : साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध, दोन्ही कुटुंबीयांची लग्नाला संमती आणि एकत्र आयुष्याची स्वप्नं... मात्र, दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने या नात्याचा रक्तरंजित शेवट झाला. पुण्यातील हिंजवडी परिसरात सोमवारी पहाटे (दि. २३) एका २७ वर्षीय तरुणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत कोमल ढाके ही विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होती, तर आरोपी शुभम काळबांडे हा इन्फोसिसमध्ये कार्यरत आहे. हत्येनंतर आरोपी अनेक तास प्रेयसीच्या मृतदेहाजवळच बसून राहिल्याचा आरोप आहे. अखेर सकाळी त्यानेच पोलिसांशी संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मृत तरुणीचे नाव कोमल राजेंद्र ढाके (वय २७) असे असून ती मूळची वर्धा येथील रहिवासी होती. आरोपी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे (वय ३१) हा बुलढाणा येथील रहिवासी आहे. दोघेही पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करत होते. गेल्या साडेतीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्याची माहिती दोन्ही कुटुंबीयांना होती. तसेच त्यांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसऱ्या महिलेसोबतच्या संबंधांवरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २२) रात्री कोमल आणि शुभम एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दोघेही हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात असलेल्या कोमलच्या 'प्रिस्टाईन पीजी'मधील खोलीवर परतले. मात्र, खोलीत आल्यानंतरही त्यांच्यातील वाद सुरूच होता.
शुभमचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या मुद्द्यावरून त्यांच्यात भांडणे होत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
वाद विकोपाला, प्रेयसीला बेदम मारहाण
मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमधील वाद अधिकच वाढला. त्यातून शुभमने कोमलला ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आणि बेडवर आपटल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हत्येनंतर अनेक तास मृतदेहाशेजारीच
धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर आरोपी अनेक तास कोमलच्या मृतदेहाजवळच बसून होता, असा आरोप आहे. सोमवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता त्याने ११२ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका पाठवण्याची मागणी केली.
रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित
माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पीजी निवासस्थानी पोहोचले. त्यांनी कोमलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. प्राथमिक चौकशी आणि आरोपीच्या सहभागाची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी शुभम काळबांडे याला अटक केली.
पुणे पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) प्रदीप जाधव यांनी आरोपीच्या अटकेला दुजोरा दिला आहे. कोमल विप्रोमध्ये, तर शुभम इन्फोसिसमध्ये कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.