Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केतन अग्रवालशी नोव्हेंबरमध्ये लग्न होणार असलेल्या सिया गोयलला पोलिसांनी अटक केली आहे. लोहगड किल्ल्यावर झालेला मृत्यू अपघात नसून कथित कटाचा भाग असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे
Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे
Published on

लोहगड किल्ल्यावरून सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून झालेला २६ वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. १८ जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर केतनशी नोव्हेंबरमध्ये विवाह होणार असलेल्या सिया गोयल (२०) हिने फोटो काढताना त्याचा तोल जाऊन तो दरीत पडल्याचे सांगितले होते. मात्र काही दिवसांतच या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, हा अपघात नसून नियोजित कटाचा भाग असल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक करण्यात आली आहे.

केतन अग्रवाल हा गहुंजे येथील रहिवासी होता. तो आपल्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट व्यवसायात संचालक म्हणून कार्यरत होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, केतनचे सिया गोयलसोबत लग्न ठरले होते आणि नोव्हेंबर महिन्यात विवाहसोहळा पार पडणार होता. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची तयारी सुरू केली होती. राजस्थानमधील उदयपूर येथे विवाहसोहळ्यासाठी पॅलेसही बुक करण्यात आल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. लग्नाला काहीच महिने शिल्लक असताना दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने लोहगड ट्रिप

१८ जून रोजी सियाचा वाढदिवस जवळ आल्याने केतन, सिया आणि इतर मित्र लोहगड किल्ल्यावर गेले होते. ट्रिपदरम्यान केतन दरीत पडल्याची माहिती समोर आली. बचाव पथकाने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला ही घटना अपघात मानून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर सिया गोयलने सुरक्षा रक्षक, पोलिस आणि केतनच्या कुटुंबीयांना केतन फोटो काढताना तोल जाऊन दरीत पडल्याचे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही.

तपासाला कलाटणी कशी मिळाली?

दरम्यान, केतनच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. 'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, मृत्यूपूर्वी केतन आणि सिया यांच्यात काही वाद सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला.

तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या छाननीदरम्यान चेतन चौधरी हा आणखी एक व्यक्ती घटनास्थळाजवळ उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळले. याच धाग्याच्या आधारे तपासाची दिशा बदलली आणि प्रकरणातील कथित कटकारस्थानाचा उलगडा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

व्यवसायातून ओळख, पुढे वाढली जवळीक

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयलने नुकताच बेकरी व्यवसाय सुरू केला होता, तर चेतन चौधरी हा घाऊक ड्रायफ्रूट आणि पॅकेजिंग व्यवसायाशी संबंधित आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील व्यावसायिक व्यवहारांमधून दोघांची ओळख झाली होती.

पोलिसांच्या मते, व्यावसायिक ओळखीतून सुरू झालेली मैत्री पुढे प्रेमसंबंधांत बदलली. विशेष म्हणजे, अग्रवाल कुटुंबाचाही व्यवसाय याच क्षेत्राशी संबंधित असल्याने तिघेही एकमेकांना ओळखत होते.

१४ जूनची भेटही तपासाच्या रडारवर

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटना घडण्याच्या चार दिवस आधी म्हणजे १४ जून रोजी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर गेले होते. ही केवळ सहल होती की संभाव्य गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या मते, आरोपींनी सुमारे आठवडाभर आधीच कट रचला असावा. तसेच, घटना घडली त्या दिवशी चेतन चौधरी हा परिसरात आधीपासून उपस्थित होता. त्यानंतर कथित कटानुसार संपूर्ण घटना घडवून आणण्यात आली आणि मृत्यू अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे
Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना

पुढील तपास सुरू

या प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि घटनेपूर्वीच्या हालचालींची तपासणी सुरू आहे. या प्रकरणातील सर्व धागेदोरे जोडण्यासाठी आणि कथित कटाचे संपूर्ण स्वरूप उघड करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in